Saina Nehwal on Congress MLA Remark : दावणगेरे दक्षिण येथील काँग्रेसचे विद्यमान आमदार 92 वर्षीय शिवशंकरप्पा (Shamanur Shivshankarappa) यांनी माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार सिद्धेश्वरा जीएम यांची पत्नी गायत्री सिद्धेश्वर (Gayatri Siddheshwar) यांच्यावर बोलत असताना महिलाविरोधी एक वक्तव्य केलं होतं. महिलांनी स्वयंपाकघरापुरतंच मर्यादित राहावं, असं खळबळजनक वक्तव्य शामनूर शिवशंकरप्पा यांनी केलं होतं. त्यावरून आता मोठा राडा झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता भारताची स्टार बॅडमिंटनपट्टू सायना नेहवालने (Saina Nehwal) शिवशंकरप्पा यांच्या वक्तव्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाली सायना नेहवाल?


दावणगेरेच्या उमेदवार गायत्री सिद्धेश्वरावर केलेली ही लैंगिक टिप्पणी किमान मी मुलगी आहे, मी लढू शकते, असं म्हणणाऱ्या पक्षाकडून तरी अपेक्षा करता येणार नाही. जेव्हा भारतातील महिला प्रत्येक क्षेत्रात आपली छाप सोडण्याची आकांक्षा बाळगतात तेव्हा महिलांबद्दल होणाऱ्या अशा द्वेषपूर्ण टिप्पण्या नक्कीच अस्वस्थ करतात, असं  सायना नेहवाल म्हणाली आहे. जेव्हा मी क्रिडा क्षेत्रात काम करत होते, तेव्हा काँग्रेस पक्षाला माझ्याकडून काय अपेक्षा होती? मी नेमकं काय करायला हवं होतं? असा सवाल देखील सायनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विचारला आहे.


सध्या कोणत्याही क्षेत्रात मुली अग्रेसर आहे. मोठमोठं यश संपादन करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आहे. एकीकडे आम्ही महिला शक्तीला सलाम करतोय, तर दुसरीकडे अशी वक्तव्य होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं आणि दुसरीकडे स्त्री शक्तीचा अपमान आणि स्त्रीविरोधी लोक आहेत, असंही सायना नेहवाल म्हणाली आहे. स्त्रीविरोधी अशी वक्तव्य खूप त्रासदायक आहेत, असंही सायना नेहवालने म्हटलं आहे.



दरम्यान, शिवशंकरप्पा अनेकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहिले आहेत. गायत्री सिद्धेश्वर यांच्यावर बोलताना स्वयंपाकघरात स्वयंपाक कसा करायचा हे फक्त माहित आहे. गायत्रीला नीट कसं बोलावं हे देखील कळत नाही. ती घरात स्वयंपाक करण्यासाठीच योग्य आहे, असं म्हणत शिवशंकरप्पा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावर आता मोठा राडा होताना दिसत आहे. भारताची फुलराणी सायना नेहवालने 2020 मध्ये भाजपात प्रवेश केला होता. सायनाने काही दिवसांपूर्वी नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाचं समर्थन केलं होतं. त्यामुळे सायना लोकसभा निवडणूक लढवणार की काय? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात होता.