सनथ जयसूर्याला दणका, आयसीसीची दोन वर्षांची बंदी
आयसीसीनं श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्याला दणका दिला आहे.
दुबई : आयसीसीनं श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्याला दणका दिला आहे. आयसीसीच्या भ्रष्टाचार विरोधी आचार संहिता भंग केल्याप्रकरणी जयसूर्याचं २ वर्षांसाठी निलंबन झालं आहे. आयसीसीच्या २.४.६ आणि २.४.७ च्या कलमानुसार जयसूर्यावर ही कारवाई झाली. कलम २.४.६ मध्ये आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या चौकशीला मदत केली नाही. तसंच पथकानं मागितलेली माहिती आणि कागदपत्र न देणं आणि २.४.७ मध्ये भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या चौकशीत अडथळे निर्माण करणं, तसंच माहिती लपवणं, तपासासाठी महत्त्वाची असणारी कागदपत्र गहाळ करणं याचा समावेश होतो. सनथ जयसूर्यानंही आपण आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी आचारसंहितेचा भंग केल्याचं मान्य केलं आहे.
सनथ जयसूर्यानं श्रीलंकेकडून १९८९-२०११ पर्यंत क्रिकेट खेळलं. २२ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत जयसूर्यानं ११० टेस्ट आणि ४४५ वनडे खेळल्या. जयसूर्या श्रीलंकेचा माजी खासदारही आहे. सनथ जयसूर्या हा श्रीलंकेच्या निवड समितीचा माजी अध्यक्षही होता.
सनथ जयसूर्या हा सध्या क्रिकेट खेळत नाही, पण तरी त्याच्यावर आयसीसीनं ही कारवाई केली आहे. ही कारवाई झाल्यामुळे सनथ जयसूर्या पुढची २ वर्ष आयसीसीशी संलग्न असणाऱ्या कोणत्याही संस्थांमध्ये कोणतंही पद भुषवू शकणार नाही.