रविंद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत सांगलीच्या स्मृती मंधानानं वेस्टइंडिजविरुद्ध शतक झळकावून सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. पहिल्या इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्येही तिनं लक्षवेधी कामगिरी केली. स्मृती सांगलीची असून तिच्या शहरात आनंदाचं वातावरण आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्मृती श्रीनिवास मंधाना... महिला क्रिकेटमधली स्टार क्रिकेटपटू... महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतानं विजयी घोडदौड कायम राखताना वेस्ट इंडिजविरुद्ध दमदार विजय मिळवला. आणि या विजयात सांगलीची स्मृती चमकली. तिनं वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात नाबाद 106 रन्स केले. केवळ 108 बॉल्समध्ये ही कामगिरी केलीय. वर्ल्डकपच्या पहिल्या इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही चमकदार कामगिरी करत तिनं 72 बॉल्समध्ये 90 रन्सची खेळी केली होती. तिच्या या खेळीमुळे सांगलीमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. तसंच स्मृतीच्या आई-वडिलांनाही लेकीचा सार्थ अभिमान आहे. 


राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात चमकदार कामगिरी करणारी स्मृती ही सांगलीची खेळाडू आहे. वयाच्या सहाव्या वर्षापासून ती क्रिकेटचे धडे गिरवते... स्मृतीचं शिक्षण सांगलीतल्या चिंतामणराव व्यापार महाविद्यालयात झालं. स्मृतीचे वडील श्रीनिवास मंधाना हे स्वत: देखील क्रिकेट खेळाडू आहेत. स्मृतीन आपल्या क्रिकेटचा श्रीगणेशा त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गिरवला. तिचा मोठा भाऊ मंधाना देखील महाराष्ट्र स्तरावर खेळला आहे. वडील भावाला शिकवताना तिच्यामध्येही क्रिकेटविषयी आवड निर्माण झाली. सुरुवातीला स्मृती राईट हॅन्डेड बॅट्समन होती. मात्र तिच्या वडिलांनी तिला प्रयत्नपूर्वक लेफ्ट हॅन्डेड खेळाडू बनवलं. 


स्मृतीनं 2007 साली वयाच्या अकराव्या वर्षी पंधरा वर्षाखालील महिला क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलंय. शालेय स्पर्धेत तिनं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं होतं. महाराष्ट्रच्या अंडर नाईन्टीन महिला क्रिकेट  संघाचं कर्णधारपद सुद्धा तिनं या आधी भूषवलंय. 


2013 मध्ये बडोद्यात झालेल्या अंडर १९ एकदिवसीय सामन्यात गुजरातविरुद्ध तिनं महिला क्रिकेट स्पर्धेतील सर्वोच्च धावांचा विश्वविक्रम केलाय. 148 चेंडूवर 32 चौकारांच्या सहाय्यानं 224 धावा तडकावल्या. अशा या हरहुन्नरी आणि टॅलेन्टेड स्मृती मंधनानं वर्ल्डमध्ये आपल्या खेळीनं सा-यांचीच मनं जिंकावी हीच अपेक्षा...आणि त्यासाठी तिला खूप खूप शुभेच्छा...