नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात आठ वर्षांच्या एका मुलीसोबत जानेवारी झालेल्या सामूहिक बलात्कार आणि क्रूर हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी आठ आरोपींविरुद्ध चार्जशीट दाखल केलीय. या प्रकरणाची देशभरात निंदा होतेय. भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा हिनंदेखील या घटनेची निंदा केलीय. परंतु, त्यानंतर तिच्यावर करण्यात आलेल्या वैयक्तिक टीकेला उत्तर देताना तिला 'मी भारतीय आहे आणि नेहमीच भारतीय राहील' असं ठणकावून सांगावं लागलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जम्मू-काश्मीरच्या एका न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यासाठी गेलेल्या गुन्हे शाखा टीमला वकिलांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. 'कठुआच्या मुख्य न्यायिक मॅजिस्ट्रेटच्या न्यायालयात वकिलांद्वारे अडचणी आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. याविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय. या घटनेत ज्यांचा समावेश असेल त्यांच्याविरोधात कारवाई केली जाईल' असं पोलीस महानिरीक्षक एस पी वैद्य यांनी म्हटलंय. 


या घटनेत वकिलांवर ताबा मिळवण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. यानंतर न्यायालयात बलात्कार - हत्या प्रकरणातल्या सात आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करता येणं शक्य झालं. 


या घटनेवर टीका करणारं एक ट्विट सानिया मिर्झा हिनं केलं होतं. त्यावर एका व्यक्तीनं सानियाला ट्विट करत 'मॅडम, तुम्ही कोणत्या देशाबद्दल बोलत आहात. आता तुमचं लग्न पाकिस्तानात झालंय. आता तुम्ही भारतीय नाहीत आणि तुम्ही ट्विट करत आहातच तर तुम्हाला पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून निर्दोषांना मारण्याविषयीही ट्विट करायला हवं' असा सल्लाही दिला.



या ट्विटला उत्तर देताना सानियानं 'पहिली गोष्ट म्हणजे, कुणी कुठेही लग्न करत नाही. तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत लग्न करता. दुसरी गोष्ट - तुम्ही मला सांगू शकत नाही की कोणत्या देशातून आहे. मी भारतासाठी खेळते. मी भारतीय आहे आणि नेहमीच राहील आणि तुमचे विचार देश आणि धर्माच्या पलिकडे गेले तर तुम्ही मानवतेसाठीही उभे राहाल' असं रोखठोक प्रत्यूत्तर सानियानं दिलं. 


कठुआ सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात ट्वटि करत सानियानं म्हटलं होतं 'न्याय व्हायला हवा. न्यायावर आपला विश्वास कायम राहण्यासाठी मी आशा आणि प्रार्थना करते की न्याय लवकरच मिळेल. #UnnaoHorror #UnnaoRapeCase'