मुंबई : टीम इंडियाच्या मुख्य आणि सहाय्यक प्रशिक्षकांची निवड झाली. यामध्ये संजय बांगर वगळता इतर सगळ्यांना कायम ठेवण्यात आलं. रवी शास्त्री टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक, भरत अरुण बॉलिंग प्रशिक्षक तर आर. श्रीधर फिल्डिंग प्रशिक्षक म्हणून कायम राहिले. पण बॅटिंग प्रशिक्षक असलेल्या संजय बांगर यांच्याऐवजी विक्रम राठोड यांची नियुक्ती करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. वर्ल्ड कपच्या काही वर्षांपासूनच भारताला चौथ्या क्रमांकाचा बॅट्समन शोधण्यात अपयश येत होतं. चौथ्या क्रमांकासाठी अनेक खेळाडूंना संधी देण्यात आली, पण एकालाही यश मिळालं नाही. चौथ्या क्रमांकाच्या याच समस्येमुळे बांगर यांना प्रशिक्षकपदावरून डच्चू मिळाल्याचं सांगितलं गेलं.


संजय बांगर यांनी चौथ्या क्रमांकाच्या समस्येवर भाष्य केलं आहे. चौथ्या क्रमांकाबाबतच्या खेळाडूच्या निर्णय प्रक्रियेत संपूर्ण टीम प्रशासन आणि निवड समिती होती. सध्याचा फॉर्म, फिटनेस, डावखुरा असणं आणि बॉलिंग करु शकतो का? यावर निवड अवलंबून होती, असं बांगर म्हणाले.


पुन्हा संधी न मिळाल्यामुळे मी काही दिवस निराश होतो, पण बीसीसीआय, फ्लेचर, कुंबळे आणि शास्त्री यांचे मी आभार मानतो, अशी प्रतिक्रिया बांगर यांनी दिली आहे.


संजय बांगर हे ५ वर्ष टीम इंडियासोबत होते. या कालावधीमध्ये भारतीय टीम टेस्ट क्रिकेटमध्ये लागोपाठ ३ वर्ष पहिल्या क्रमांकावर राहिली. ५२ पैकी ३० मॅचमध्ये टीम इंडियाचा विजय झाला, यातले १३ विजय भारताबाहेरचे आहेत. या कालवधीमध्ये विराटने ४३ शतकं, रोहितने २८ शतकं आणि शिखर धवनने १८ शतकं केली, तर चेतेश्वर पुजाराने टेस्टमध्ये १२ शतकं झळकावली.