मुंबई : भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांच्यासोबत झालेल्या वादाबाबत माफी मागितली आहे. कोलकात्यामध्ये झालेल्या डे-नाईट टेस्ट मॅचदरम्यान गुलाबी बॉलवरून मांजरेकर आणि भोगले यांच्यात वाद झाला. माझ्याकडून झालेलं हे कृत्य न शोभणारं आणि संकेताला धरुन नव्हतं, असं संजय मांजरेकर यांनी स्पष्ट केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'हे वर्ष माझ्यासाठी क्रिकेट समिक्षक आणि कॉमेंटेटर म्हणून खराब होतं. हर्षा भोगलेबाबत केलेलं वक्तव्य चुकीचं होतं. त्यावेळी माझा ताबा सुटला आणि याबाबत मी दिलगिरी व्यक्त केली. माझी चूक लक्षात आल्यानंतर मी लगेच प्रोड्यूसरकडे गेलो आणि माफी मागितली,' असं संजय मांजरेकर यांनी सांगितलं.


नेमका काय वाद झाला?


कोलकात्यामध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात डे-नाईट टेस्ट मॅच झाली. भारताची ही पहिलीच डे-नाईट टेस्ट मॅच होती. डे-नाईट टेस्ट मॅच असल्यामुळे हा सामना गुलाबी बॉलने खेळवण्यात आला. पण गुलाबी बॉल हा रात्रीच्या वेळी नीट दिसतो का? याबाबत क्रिकेटपटूंचं मत काय आहे ते जाणून घेतलं पाहिजे, असं हर्षा भोगले कॉमेंट्री करताना म्हणाला. बांगलादेशच्या खेळाडूंच्या हेल्मेटवर अनेकवेळा बॉल लागले, त्यामुळे पांढऱ्या साईट-स्क्रीनसमोर गुलाबी बॉलच्या दिसण्याबाबत मॅचनंतर चर्चा झाली पाहिजे, असं हर्षा भोगले म्हणाले.


हर्षा भोगले यांच्या या वक्तव्यावर संजय मांजरेकर यांनी लगेच लाईव्ह प्रतिक्रिया दिली. स्लिपमध्ये खेळाडूंनी ज्या प्रकारे कॅच पकडले त्यामुळे गुलाबी बॉल दिसतो का नाही, हा मुद्दा असू शकत नाही, असं मला वाटतं, असं मांजरेकर म्हणाले.


मांजरेकर यांच्या या वक्तव्यावर पुन्हा हर्षा भोगलेंनी प्रतिक्रिया दिली. मैदानामध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना याबाबत विचारलं पाहिजे, असं हर्षा भोगलेंनी सांगितलं. तेव्हा आम्हालाच विचारलं पाहिजे कारण आम्ही क्रिकेट खेळलो आहोत. मैदानात नेमकं काय होतं याची आम्हाला चांगली कल्पना आहे. १०-१५ वर्ष क्रिकेट खेळल्यामुळे यावर मी अधिकारवाणीने बोलू शकतो, असं विधान मांजरेकर यांनी केलं.


संजय मांजरेकर यांच्या या टोल्यावर हर्षा भोगलेंनी त्यांची बाजू मांडली. शिकण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी फक्त क्रिकेट खेळणं हा निकष असू शकत नाही, असं हर्षा भोगले म्हणाले. पण हर्षा भोगलेने क्रिकेट खेळलं नसल्याचा निशाणा साधत मांजरेकरांनी भोगलेंची मागणी फेटाळली.