मुंबई: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या धास्तीमुळे क्रिकेटविश्वातही धास्तीचे वातावरण आहे. Covid-19 विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता इंडियन प्रीमिअर लीगसह (IPL) अनेक महत्त्वाच्या क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, या सगळ्या गदारोळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) घेतलेला एक निर्णय सर्वांच्या नजरेतून सुटला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मुंबई मिरर'च्या वृत्तानुसार, मांजरेकर यांना BCCIच्या समालोचकांच्या पॅनलमधून वगळण्यात आले आहे. आगामी IPL स्पर्धेच्यावेळीही ते समालोचन करताना दिसणार नाहीत. BCCI मांजरेकर यांच्या कामाविषयी समाधानी नसल्यामुळे त्यांना समालोचकांच्या पॅनलमधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. 


मध्यंतरी हर्षा भोगले आणि रविंद्र जाडेजा यांच्याशी झालेल्या वादांमुळे संजय मांजरेकर प्रचंड चर्चेत आले होते. यामध्ये रवींद्र जाडेजा प्रकरणात मांजरेकर यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती. मात्र, त्यामुळे तयार झालेल्या नकारात्मक वातावरणाचा संजय मांजरेकर यांना फटका बसला असावा. त्यामुळे BCCIकडून मांजरेकर यांना डच्चू देण्यात आल्याची शक्यता वर्तविली जात आहे. 


धर्मशाळा एकदिवसीय सामन्याकरता सुनील गावसकर, लक्ष्मण शिवरामकृष्णन, मुरली कार्तिक हे माजी खेळाडू समालोचनासाठी हजर होते. निवृत्तीनंतर मांजरेकर सातत्याने समालोचन करत आले आहेत. मात्र, यावेळी मांजरेकर यांना समालोचकांच्या पॅनलमधून वगळण्यात आले.


तत्पूर्वी कोरोना व्हायरसच्या देशातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमिअर लीग (IPL) स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे BCCIकडून स्पष्ट करण्यात आले. नियोजित वेळापत्रकानुसार IPL स्पर्धा २९ मार्चपासून सुरु होणे अपेक्षित होते. परंतु, कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे या स्पर्धेच्या आयोजनावर टांगती तलवार होती. अखेर ही शक्यता खरी ठरली असून आता IPL १५ एप्रिलपर्यंत लांबणीवर पडली आहे.