मुंबई : भारत आणि इंग्लंडमध्ये १ ऑगस्टपासून ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे. या सीरिजमध्ये विराट कोहली इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अंडरसनचा सामना कसा करणार याची उत्सुकता क्रिकेट रसिकांना आहे. कारण २०१४ सालच्या इंग्लंड दौऱ्यामध्ये जेम्स अंडरसननंच विराट कोहलीला सर्वाधिक त्रास दिला होता. त्यामुळे या सीरिजला आणखी महत्त्व प्राप्त झालं आहे. या सीरिजआधी भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी विराट कोहलीला काही टिप्स दिल्या. विराट कोहलीनं ऑफ स्टम्पच्या बाहेर असलेला बॉल बघितलाही नाही पाहिजे. दक्षिण आफ्रिकेमध्ये विराट चांगल्या प्रकारे ड्राईव्ह मारत होता पण बॉल जेव्हा आतमध्ये येतो तेव्हा तो एलबीडब्ल्यू होतो, असं संजय मांजरेकर म्हणाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मांजरेकर यांनी इएसपीएन क्रिकइन्फोला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये संजय मांजरेकर यांनी विराटला बॅटिंगच्या काही टिप्स दिल्या. विराट कोहली जसा बॅटिंगला येतो तसा स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अंडरसन बॉलिंगला येतात. हे दोघं महान बॅट्समनना आऊट करण्याचा प्रयत्न करतात, अशी प्रतिक्रिया मांजरेकर यांनी दिली.


विराटच्या बॅटला बॉल लागेल आणि स्लिपमध्ये त्याचा कॅच जाईल अशाच प्रकारे इंग्लंड फिल्डिंग लावेल. दोन किंवा तीन स्लिप आणि गलीही ठेवण्यात येईल आणि विराटला ड्राईव्ह मारण्यासाठी उचकवण्यात येईल, असं वक्तव्य मांजरेकर यांनी केलं. विराटला दिलेल्या या टीप्समुळे मांजरेकर सोशल नेटवर्किंगवर ट्रोल होत आहेत.