लाईव्ह कॉमेंट्री करताना हर्षा भोगले-संजय मांजरेकरमध्ये वाद
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला.
कोलकाता : बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला. भारताची ही पहिलीच डे-नाईट टेस्ट असल्यामुळे या मॅचला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालं होतं. पण या मॅचच्या लाईव्ह कॉमेंट्रीदरम्यान हर्षा भोगले आणि संजय मांजरेकर यांच्यात वाद झाले. तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच एका तासात बांगलादेशच्या विकेट पडल्या आणि भारताचा इनिंग आणि ४६ रननी विजय झाला.
डे-नाईट टेस्ट मॅच असल्यामुळे हा सामना गुलाबी बॉलने खेळवण्यात आला. पण गुलाबी बॉल हा रात्रीच्या वेळी नीट दिसतो का? याबाबत क्रिकेटपटूंचं मत काय आहे ते जाणून घेतलं पाहिजे, असं हर्षा भोगले कॉमेंट्री करताना म्हणाला. बांगलादेशच्या खेळाडूंच्या हेल्मेटवर अनेकवेळा बॉल लागले, त्यामुळे पांढऱ्या साईट-स्क्रीनसमोर गुलाबी बॉलच्या दिसण्याबाबत मॅचनंतर चर्चा झाली पाहिजे, असं हर्षा भोगले म्हणाले.
हर्षा भोगले यांच्या या वक्तव्यावर संजय मांजरेकर यांनी लगेच लाईव्ह प्रतिक्रिया दिली. स्लिपमध्ये त्यांनी ज्या प्रकारे कॅच पकडले त्यामुळे गुलाबी बॉल दिसतो का नाही, हा मुद्दा असू शकत नाही, असं मला वाटतं, असं मांजरेकर म्हणाले.
मांजरेकर यांच्या या वक्तव्यावर पुन्हा हर्षा भोगलेंनी प्रतिक्रिया दिली. मैदानामध्ये खेळणाऱ्या खेळाडूंना याबाबत विचारलं पाहिजे, असं हर्षा भोगलेंनी सांगितलं. तेव्हा आम्हालाच विचारलं पाहिजे कारण आम्ही क्रिकेट खेळलो आहोत. मैदानात नेमकं काय होतं याची आम्हाला चांगली कल्पना आहे. १०-१५ वर्ष क्रिकेट खेळल्यामुळे यावर मी अधिकारवाणीने बोलू शकतो, असं विधान मांजरेकर यांनी केलं.
संजय मांजरेकर यांच्या या टोल्यावर हर्षा भोगलेंनी त्यांची बाजू मांडली. शिकण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी फक्त क्रिकेट खेळणं हा निकष असू शकत नाही, असं हर्षा भोगले म्हणाले. पण हर्षा भोगलेने क्रिकेट खेळलं नसल्याचा निशाणा साधत मांजरेकरांनी भोगलेंची मागणी फेटाळली.
हर्षा भोगलेंसोबत घातलेल्या या वादानंतर संजय मांजरेकर यांना ट्विटरवर ट्रोल करण्यात येत आहे. अनेकांनी हर्षा भोगलेंना पाठिंबा देत मांजरेकर यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीकडे केली आहे.