मुंबई : आजपासून आयपीएलच्या 15 व्या सिझनला सुरुवात होणार आहे. सर्वजण सामने पाहण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र आयपीएल सुरु होण्याच्या एक दिवस अगोदर राजस्थानच्या टीममध्ये मोठा वाद झाल्याचं दिसून आलं. कर्णधार संजू सॅमसनसंदर्भात हा वाद झाला असून या वादानंतर संजूने मोठं पाऊल उचललं आहे. हा वाद इतका टोकाला गेलाय की संजू सॅमसनने आपलीच टीम राजस्थान रॉयल्सला ट्विटरवरून अनफॉलो केलं आहे.


वाद नेमका काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थान रॉयल्सच्या सोशल मीडियाच्या एका पेजवरुन कर्णधार संजू सॅमसनबद्दल एक मीम शेअर करण्यात आला होता. मात्र हा शेअर केलेला मीम संजूला काही पटला नाही. यानंतर संजुने ट्विटद्वारे टीमला प्रोफेशनल दृष्टिकोन स्वीकारण्याचा सल्ला दिला. तसंच यावर नाराजी व्यक्त करत ट्विटवर राजस्थानच्या सोशल मीडिया अकाऊंटला अनफॉलो केलं आहे.


राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला हा विनोद आवडला नाही आणि त्याने आधी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली. यानंतर त्याने सिनियर मॅनेजमेंटकडे याबाबत तक्रारही केली. संजूच्या चाहत्यांनीही राजस्थानच्या सोशल मीडिया टीमवर टीका केली. 


या सर्व वादग्रस्त प्रकारानंतर राजस्थान रॉयल्स टीमने हे मीम डिलीट केलं. यानंतर राजस्थानकडून एक निवेदन प्रसिद्ध केलं. या निवेदनावद्वारे राजस्थानने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे राजस्थानने सोशल मीडिया टीममध्ये बदल करण्याचाही निर्णय घेतला आहे.


राजस्थानने निवेदनात काय म्हटलंय?


ही घटना लक्षात घेता आम्ही सोशल मीडिया टीम आणि दृष्टिकोन बदलण्याचा निर्णय घेतलाय. टीममध्ये सर्व काही आलबेल आहे. आम्ही हैदराबाद विरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी सज्ज आहोत. टीम मॅनेजमेंट डिजीटल गोष्टींवर लक्ष देईल. तसंच नवी टीम देखील नियुक्त करणार आहे.