भारताच्या टी-20 वर्ल्डकप विजेत्या संघात फलंदाज-यष्टीरक्षक संजू सॅमसनला (Sanju Samson) स्थान मिळालं नाही. फॉर्ममध्ये असणाऱ्या संजू सॅमसन ऐवजी रोहित शर्माने (Rohit Sharma) मोठ्या दुखापतीनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या ऋषभ पंतला (Rishabh Pant) खेळवण्याची जोखीम उचलली होती. पण अंतिम सामन्याच्या आधी रोहित शर्माने संजू सॅमसनला खेळण्यासाठी तयार राहा असं सांगितलं होतं. यामुळे अंतिम सामन्यात संजू सॅमसन मैदानात उतरणार हे जवळपास निश्चित झालं होतं. पण टॉसच्या काही मिनिटं आधी सर्व गणितं बदलली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संजू सॅमसनने मुलाखतीत खुलासा केला आहे की, तो फायनलमध्ये खेळण्यासाठी तयारी करत होत. पण रोहित शर्माने प्लेईंग 11 सारखीच राहील असं सांगितलं. "मला अंतिम सामन्यात खेळण्याची संधी होती. मला तयार राहण्यास सांगण्यात आलं होतं. मी पूर्णपणे तयार होतो. पण टॉसच्या आधी त्यांना संघ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. मी म्हटलं ठीक आहे, काही चिंता नाही. मी त्याच मूडमध्ये होतो," असं संजू सॅमसनने सांगितलं.


प्लेईंग 11 ठरल्यानंतर रोहित शर्माने संजू सॅमसनला बराच वेळ या निर्णयामागील कारण समजावून सांगितलं. "वॉर्म-अप दरम्यान रोहितने मला बाजूला नेलं आणि हा निर्णय का घेत आहोत हे समजावून सांगितलं. तो म्हणत होता, तुला समजतंय ना? तुम्हाला त्याची पद्धत माहिती आहे. तो अत्यंत सामान्यपणे बोलतो. मी त्याला म्हटलं, आपण सामना जिंकू आणि त्यानंतर बोलू. तू सध्या सामन्यावर लक्ष केंद्रीत कर," अशी माहिती संजू सॅमसनने दिली. 


पुढे त्याने सांगितलं की, "तो एका मिनिटाने परत आला आणि म्हणाला, 'मला माहितीये की, तू मनातून मला शाप देतोयस'. मला वाटतं तू आनंदी नाहीस. तुझ्या डोक्यात काहीतरी सुरु आहे असं वाटत आहे. यानंतर आमच्यात चर्चा झाली. मी त्याला एक खेळाडू म्हणून माझी खेळण्याची इच्छा आहे असं सांगितलं".


त्याच्या नेतृत्वात अंतिम सामना खेळण्याची संधी गमावण्याची माझी इच्छा नाही असंही मी रोहित शर्माला सांगितल्याचं सॅमसनने सांगितलं. आता आयुष्यभर ही खंत घेऊन मला जगावं लागेल असंही तो म्हणाला. "लहानपणापासून मला येथे येऊन काहीतरी करण्याची इच्छा होती. मला त्याने तुझा पॅटर्न असा आहे वैगेरे गोष्टी सांगितल्या. मी म्हटलं, तू येऊन मला समजावून सांगितलंस याचा मी आदर करतो. मी त्याला म्हटलं, मी तुझ्यासारख्या नेतृत्वाखाली वर्ल्डकप फायनल खेळू शकतो नाही याची मला खंत आहे. मी रोहित शर्मासारख्या कर्णधाराच्या नेतृत्वात वर्ल्डकप फायनल गमावली ही खंत कायम राहील," असंही संजू सॅमसन म्हणाला. 


दरम्यान रोहित शर्माने संघातील खेळाडूंऐवजी ज्यांनी वगळलं आहे त्यांच्यासह वेळ घालवला या गोष्टीमुळे आपल्या मनात त्याच्याबद्दल आदर वाढल्याचंही संजू सॅमसनने सांगितलं. "यानंतर मी विचार केला की, वर्ल्डकप फायनल ही किती मोठी गोष्ट आहे. अंतिम सामन्याआधी तुम्हाला निर्णय बदलावा लागतो. तुम्ही टॉसआधी जो खेळाडू खेळणार नाही त्याच्यासह 10 मिनिटं घालवता. त्याने मला 10 मिनिटं दिली. त्यानंतर हा वेगळाच कौशल्य असलेला व्यक्ती आहे हे मला जाणवलं".


"जर मी त्याच्या जागी असतो तर जे खेळाडू संघात आहेत त्यांच्याबद्दल विचार केला असता. मी संजूला नंतर समजावून सांगेन असं ठरववलं असतं. पण त्याने मला तेव्हाच समजावून सांगितलं की, आपण हा निर्णय का घेतला आहे. त्या क्षणी रोहितने माझं मन कायमचं जिंकलं," अशी भावना संजूने व्यक्त केली.