Sanju Samson wicket video viral 2nd ODI:  वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारतीय संघाला पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे. यजमान वेस्ट इंडिजच्या संघाने भारताला 6 विकेट्सने पराभूत करुन एकदिवसीय मालिका 1-1 च्या बरोबरीत आणली आहे. दुसऱ्या एकदिसवीय सामन्यामध्ये भारतीय फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. त्यामुळेच पावसाचा फटका बसलेल्या या सामन्यामध्ये भारताला केवळ 181 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यानंतर गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे 4 विकेट्सच्या मोबदल्यात यजमानांनी सामना 37 व्या ओव्हरमध्येच जिंकला.


केवळ 19 चेंडू खेळला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली यांना सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. मात्र यामुळे संजू सॅमसनला संधी देण्यात आली. मात्र संजू सॅमसनला या सामन्यात आपली छाप पाडता आली नाही. केवळ 9 धावा करुन संजू फिरकी गोलंदाज यानिक कारियाच्या चेंडूवर स्लीपमध्ये झेल देऊन बाद झाला. संजू केवळ 19 चेंडूंपुरता मैदानात होता. त्याला चांगली खेळी करता आली नाही. मात्र तो ज्या पद्धतीने बाद झाला त्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.


काही वेळ विश्वासच बसत नव्हता


यानिक कारियाने टाकलेल्या एक भन्नाट चेंडूवर संजू बाद झाला. संजूच्या विकेटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फिरकी चेंडू न समजल्याने संजू बॅकफूटवर गेला मात्र त्याने बॅट चेंडूच्या मार्गातून बाजूला घेतली नाही. संजूला काही समजण्याच्या आतच चेंडू बॅटची कड घेऊन स्लीपमध्ये उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातात स्थिरावला. हे सारं काही इतक्या क्षणात घडलं की आपण बाद झालोय यावर संजूला काही वेळ विश्वासच बसत नव्हता.


बॅट काढून घेण्याचाही वेळ मिळाला नाही


चेंडू लेग स्टम्पच्या लाइनवर पडला आणि वेगात विरुद्ध दिशेला फिरला. पापणी लवण्याच्या आतच चेंडू बॅटला लागून स्लीपमध्ये झेल घेत क्षेत्ररक्षकाने पकडला. आपली बॅट चेंडूच्या मार्गातून काढून घेण्याचा वेळही संजूला मिळाला नाही. नेमकं आपल्याबरोबर काय घडलं हे समजून घेण्यासाठी संजूने काही वेळ घेतला. नंतर तो मान खाली घालून पव्हेलियनकडे चालू लागला. अनेकांनी हा चेंडू जवळजवळ 90 अंशांमध्ये वळल्याचं म्हटलं आहे.



भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना 1 ऑगस्ट रोजी होणार आहे. हा सामना जिंकणारा संघ मालिकाही जिंकेल.