जगातील सर्वात मोठं मैदान तयार, ट्रम्प यांच्या हस्ते उद्घाटन
१ लाख १० हजार प्रेक्षकांची जागा
अहमदाबाद : 1987 मध्ये गुजरातच्या सरदार पटेल स्टेडियममध्ये सुनील गावस्कर यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये इतिहास रचला होता. 10 हजार रन करणारे ते पहिले खेळाडू ठरले होते. ज्या मैदानावर कपिल देव यांनी रिचर्ड हॅडलीच्या टेस्ट क्रिकेटचा 432 विकेट घेण्याचा विक्रम मोडला होता. 2017 मध्ये ते स्टेडिअम पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आलं होतं. पण आता या स्टेडिअमचं काम पूर्ण झालं असून जगातील हे सर्वात मोठं स्टेडिअम बनवण्यात आलं आहे.
स्टेडिअममध्ये आता पुन्हा एकदा सामने होणार आहेत. 1983 ते 2014 दरम्यान अनेक इतिहास या मैदानात रचले गेले. पण आता हे भव्य असं स्टेडिअम पुन्हा एकदा अनेक रेकॉर्ड मोडण्यासाठी सज्ज झालं आहे. 24 ते 25 फेब्रवारी दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार आहे.
सरदार पटेल स्टेडिअममध्ये 1983 ते 2014 दरम्यान 12 टेस्ट आणि 24 वनडे सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये 2011 चा वर्ल्डकप आणि 2006 चा आयसीसी चॅम्पियस ट्रॉफीचा सामना देखील आहे.
गुजरात क्रिकेट बोर्डाने हे स्टेडिअम पुन्हा बांधण्याचा निर्णय घेतला होता. या मैदानात १ लाख १० हजार लोकं सामना बघू शकता. सरदार पटेल क्रिकेट स्टेडिअम हे ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट स्टेडिअम पेक्षा ही मोठा आहे.
गुजरातच्या अहमदाबाद येथे असलेल्या या स्टेडिअमला बांधण्यासाठी 700 कोटींचा खर्च आला. 63 एकर जागेवर हे मैदान उभारण्यात आलं आहे.