ऐतिहासिक : सौदी अरबमध्ये महिला पहिल्यांदाच पाहणार फुटबॉलचा सामना
जगभरातील महिलांनी मोठी मजल मारली असताना सौदी अरेबियातील महिलांसाठी उशीरा का होईना बदलाची दारे किलकिली होताना दिसत आहेत.
रियाध: जगभरातील महिलांनी मोठी मजल मारली असताना सौदी अरेबियातील महिलांसाठी उशीरा का होईना बदलाची दारे किलकिली होताना दिसत आहेत. देशाच्या इतिहासात सौदीच्या महिला पहिल्यांदाच फुटबॉलचा सामा पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचणार आहेत.
सौदी सरकारने दिली माहिती
सौदीतील अरब सरकारनेही म्हटले आहे की, शुक्रवारी खेळल्या जाणाऱ्या फुटबॉल सामन्यात महिलांसाठी स्टेडियमचे दरवाजे पहिल्यांदाच उघडले जाणार आहेत. ज्यामुळे सौदीच्या महिला फुटबॉलचा आनंद घेऊ शकतील.
यंदाचे वर्ष सौदी महिलांसाठी शुभशकून?
दरम्यान, सौदीच्या सूचना मंत्रालयाने म्हटले आहे की, जो सामना महिला पाहणार आहेत तो सामना अल-अह्ली आणि अल बातिन यांच्यात होणार आहे. महत्तवाचे म्हणजे यानंतर १३ आणि परत १८ जानेवारीलाही होणारे फुटबॉल सामन्यांचा आनंद महिला घेऊ शकतील. या सामन्यांपैकी पहिला, दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे रियाद, जेद्दा आणि दम्माम येथे खेळला जाईल.
परंपरावादी प्रतिमा बदलण्यासाठी सौदीचे प्रयत्न?
अंत्यत रूढी आणि परंपरावादी देश अशी सौदीची जगभरात ओळख आहे. मात्र, बहुदा जगभरात असलेली देशाची ही प्रतिमा बदलण्याचा सौदी सरकारचा विचार असावा. कदाचीत म्हणूनच गेल्या काही दिवसांपासून महिलांवर असलेली काही बंधणे सौदी सरकार कमी करताना दिसत आहे. यापूर्वी गेल्या वर्षीही (डिसेंबर महिन्यात) सौदी सरकारने महिलांना रियाद येथील स्टेडीयममध्ये खेळाचा सामना पहाण्यास अनुमती दिली होती.