मेलबर्न : क्रिकेटच्या मैदानावर अनेकदा दुर्घटना घडल्या आहेत. क्रिकेटच्या मैदानावर बॉल लागून अनेक क्रिकेटर्सनी आपला जीव गमावलाय. फिल ह्यूज, रमण लांबा, जुल्फीकार भट्टी, इयान फोली, जॉर्ज समर्स यासारख्या क्रिकेटर्सना आपला जीव गमवावा लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियामध्ये स्थानिक स्पर्धेदरम्यान अशीच एक धक्कादायक घटना घडलीये. ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत क्रिकेटर सीन अॅबॉटच्या गोलंदाजीवर एक क्रिकेटर जमिनीवर कोसळला. या घटनेने फिल ह्यूज दुर्घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या. ह्यूजही अॅबॉटच्या गोलंदाजीमुळे जखमी झाला होता. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला. 


न्यू साऊथ वेल्सचा गोलंदाजाने टाकलेला चेंडू व्हिक्टोरियाच्या विल पुकोवेस्कीच्या हेल्मेटला लागला. ज्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. मेलबर्न जंक्शन ओव्हल मैदानावर पुकोवेस्की जखमी झाल्यानंतर कोसळला. 


यावेळी मैदानावरील फिजीओ स्टाफने त्याची मदत केली. याआधी नोव्हेंबर २०१४मध्ये सिडनीच्या क्रिकेट मैदानावर अॅबॉटच्या चेंडूने फिल ह्यूजचा मृत्यू झाला होता. 



 


२५ वर्षीय फिलचा मृत्यू बाऊंसर लागल्याने झाला होता. बाऊंसर लागल्याने फिल जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याच्या डोक्यावर सर्जरीही करण्यात आली. मात्र दोन दिवस कोमामध्ये गेल्यानंतर त्याचा मृत्यू झाला.