`म्हणून ऑस्ट्रेलियानं स्लेजिंग केलं नाही`
भारताविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा ४-१नं दारूण पराभव झाला.
मुंबई : भारताविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा ४-१नं दारूण पराभव झाला. सीरिजमध्ये ३-० नं पिछाडीवर पडल्यानंतरही ऑस्ट्रेलियानं नेहमी सारखा आक्रमक खेळही केला नाही. एवढच काय तर स्लेजिंगसाठी प्रसिद्ध असलेली ऑस्ट्रेलियाची टीम यंदा गप्प राहिली. भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनं ऑस्ट्रेलियाचं गप्प राहण्याचं कारण सांगितलं आहे.
आयपीएलच्या लिलावावर लक्ष असल्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी स्लेजिंग केलं नसल्याचा दावा सेहवागनं केला आहे. भारतीय खेळाडूंना मैदानामध्ये स्लेजिंग केलं, शिव्या दिल्या तर आयपीएलमध्ये मोठी रक्कम मिळणार नाही, हे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना माहिती आहे, असं सेहवाग म्हणाला. पुढच्या वर्षीच्या आयपीएलआधी मोठ्या प्रमाणावर खेळाडूंचा लिलाव होणार आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया सीरिजमध्ये नेहमीच वाद होत आले आहेत. मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियाची टीम भारतात असताना टेस्ट मॅचवेळी डीआरएस घेण्यावरून मोठा वाद झाला होता. बंगळुरूमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टवेळी डीआरएस घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टिव्ह स्मिथनं ड्रेसिंग रूमकडे इशारा केला होता. स्मिथच्या या वर्तणुकीवर कोहलीनं आक्षेप घेतला होता.