मुंबई : भारतीय क्रिकेट टीमचा कोच अनिल कुंबळेचा करार संपत आहे. त्यामुळे बीसीसीआयनं नवा कोच नियुक्त करण्यासाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी बीसीसीआयकडून भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागलाही अर्ज पाठवण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्रानं ही बातमी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेहवाग हा आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा कोच आहे. यंदाच्या आयपीएलवेळीच सेहवागला भारताच्या कोच पदासाठी अर्ज करण्यासाठी बीसीसीआयच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान अर्ज करणाऱ्या खेळाडूंमध्ये सेहवागबरोबरच आणखी काही माजी क्रिकेटपटू असतील असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.


भारताचा सध्याचा कोच अनिल कुंबळेनं बीसीसीआयकडे पगारवाढीची मागणी केली. यामुळे बीसीसीआयमधले अधिकारी नाराज झाल्याचं बोललं जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर कुंबळेचा करार संपत आहे त्यामुळे नाराज बीसीसीआयनं अर्ज मागवायला सुरुवात केली.


दरम्यान अनिल कुंबळे पुन्हा एकदा कोच होण्यासाठी अर्ज करू शकतो, असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं आहे. ३१ मे ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांची समिती हे अर्ज पाहून इच्छुकांच्या मुलाखती घेतील आणि भारताचा नवा कोच निवडतील.