न्यूझीलंडच्या कर्णधाराला गंभीर दुखापत; अटीतटीच्या सामन्यातून बाहेर
दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे.
मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईत दुसरा कसोटी सामना खेळला जातोय. वानखेडेचं मैदान ओले असल्यामुळे टॉस वेळेवर होऊ न शकला नाही. यामुळे सामना सुरु होण्यासही उशीर झाला. दरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसला आहे.
पाहुण्या टीमचा स्टार कर्णधार आणि फलंदाज केन विल्यमसन दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर पडला आहे. त्याच्या डाव्या हाताच्या कोपराचा त्रास पुन्हा वाढला आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याचा समावेश करण्यात आलेला नाही.
केनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम न्यूझीलंडच्या कर्णधार पदाची धुरा सांभाळतोय. टी-20 मालिकेत त्याला विश्रांती देण्यात आली होती. गेल्या वर्षभरापासून तो कोपराच्या दुखीने त्रस्त आहे.
न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी सांगितले की, "कानपूर कसोटीत दुखापत पुन्हा झाली आणि तो अद्याप बरा झालेला नाही, त्यामुळे त्याला बाहेर ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला."
ते म्हणाले, “अशा वारंवार होणाऱ्या दुखापतींचा सामना करणं केनसाठी सोपं नाही. आम्ही ते वर्षभर टाळण्यात यशस्वी झालो आणि टी-२० वर्ल्ड कपमध्येही. पण आता कसोटी क्रिकेटमध्ये अधिक फलंदाजी करावी लागते आणि दुखापत पुन्हा त्रास देऊ लागली आहे."
“इजा अजूनही बरी झालेली नाही. तो कानपूर कसोटी खेळला आहे पण इथे खेळू शकणार नाही. दुखापतीमुळे हे वर्ष त्याच्यासाठी खडतर गेलं असून आता आपल्याला अशी रणनीती बनवावी लागेल की दुखापत त्याला वारंवार त्रास देऊ नये. त्याला विश्रांतीची गरज आहे," असंही स्टीड म्हणाले.