मुंबई : आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळलेल्या शादाब जकातीने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. धोनीच्या चेन्नईने आतापर्यंत ३ वेळा आयपीएल स्पर्धा जिंकली. यातल्या २ स्पर्धा जिंकण्यात शादाब जकातीने महत्त्वाची भूमिका बजावली. डावखुरा स्पिनर असणाऱ्या जकातीने २०१७ साली गोव्यासाठी त्याची शेवटची प्रथम श्रेणी आणि लिस्ट ए मॅच खेळली. मागच्या वर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आंध्र प्रदेशविरुद्धची मॅच शादाब जकातीची शेवटची टी-२० मॅच ठरली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३९ वर्षांच्या शादाब जकातीचं क्रिकेटमध्ये नाव झालं ते आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळताना. २००९ साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयपीएलमध्ये जकातीने शानदार कामगिरी केली. फास्ट बॉलरना मदत करणाऱ्या आफ्रिकेच्या खेळपट्ट्यांवर जकातीने लागोपाठ २ मॅचमध्ये ४-४ विकेट घेतल्या. त्या मोसमात जकातीला १३ विकेट घेण्यात यश आलं. २००९ साली चेन्नईची टीम आयपीएलच्या सेमी फायनलपर्यंत पोहोचली होती.


२०१० सालच्या मोसमात जकातीने १३ आणि २०११ साली ११ विकेट घेतल्या. या दोन्ही आयपीएलमध्ये चेन्नईचा विजय झाला. २०११ नंतर मात्र जकातीचा फॉर्म ढासळला. २०१२ साली जकातीला १५ मॅचमध्ये ९ विकेट मिळाल्या. २०१३ साली जकाती आयपीएल खेळला नाही.


२०१४ साली जकाती बंगळुरूकडून खेळला. पण बंगळुरूने त्याला फक्त एका मॅचमध्ये संधी दिली. २०१६ साली जकाती गुजरातकडून ८ मॅच खेळला. यामध्ये जकातीला फक्त २ विकेटच मिळाल्या. आयपीएलमध्ये जकातीने ५९ मॅचमध्ये ४७ विकेट घेतल्या.


१९९८ साली जकातीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. ९२ प्रथम श्रेणी मॅचमध्ये जकातीने २७५ विकेट घेतल्या, यामध्ये १३ वेळा ५ विकेटचा समावेश आहे. बॅटिंग करताना जकातीने २,७३४ रन, एक शतक आणि १४ अर्धशतकं केली. लिस्ट ए कारकिर्दीमध्ये जकातीने ८२ मॅचमध्ये ९३ विकेट घेतल्या आणि १,१०४ रन केले, यात ४ अर्धशतकं आहेत.