Shah Rukh Vs Ness Wadia: इंडियन प्रिमिअर लीगच्या पुढील पर्वासाठीच्या बैठकींचं सत्र सुरु झालं आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या माध्यमातून या बैठकींचं आयोजन केलं जात आहे. नुकतीच आयपीएलच्या संघ मालकांची अशी एक बैठक पार पडली. यामध्ये प्रामुख्याने परदेशी खेळाडूंसंदर्भातील काही धोरणात्मक निर्णय घेणं अपेक्षित होतं. बुधवारी पार पडलेल्या या बैठकीमध्ये एक मोठा राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या राड्यामध्ये सनरायझर्स हैदराबादच्या मालकीण काव्या मारन यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. नेमकं घडलं काय जाणून घेऊयात...


शाहरुखचं म्हणणं काय होतं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खेळाडूंना रिटेन करण्याबरोबरच परदेशी खेळाडूंसंदर्भातील धोरणात्मक बदल आणि लिलाव प्रक्रिया यंदा कशी असावी याबद्दल आयपीएल संघ मालकांचं मत जाणून घेण्यासाठी बीसीसीआयने बोलावलेली ही बैठक मुंबईमधील चर्चगेट येथील क्रिकेट सेंटर येथे पार पडली. आयपीएलच्या संघ मालकांनी आपली वेगवेगळी मतं मांडली. यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा संघ मालक शाहरुख खानचाही समावेश होता. शाहरुखने 18 व्या पर्वासाठी लिलाव ठेवूच नये असं म्हणत लिलाव प्रक्रियेलाच विरोध केला. 2025 च्या पर्वासाठी लिलाव नको असं शाहरुखचं म्हणणं होतं, असं वृत्त 'क्रिकबझ'ने दिलं आहे. मात्र दुसरीकडे पंजाब किंग्ज इलेव्हनचे संघ मालक असलेल्या नेस वाडिया यांनी लिलावाचं समर्थन केलं. 


नेस वाडियांचं म्हणणं काय?


एका क्षणी असं झालं की शाहरुख आणि नेस वाडिया आमने-सामने आले. शाहरुखने खेळाडूंना कायम ठेवण्यासंदर्भातील जास्तीत जास्त मूभा द्यावी अशी मागणी केली. म्हणजेच प्लेअर रिटेंशनचं प्रमाण अधिक ठेवून लिलावावर कमी भर दिला पाहिजे असं शाहरुख म्हणाला. तर दुसरीकडे नेस वाडिया यांनी अधिक खेळाडू रिटेन करण्याची परवानगी देऊ नये. मर्यादित संख्येमध्येच खेळाडू रिटेन झाले पाहिजेत असं नेस वाडिया यांचं म्हणणं होतं. या दोघांमध्ये यावरुन बाचाबाची झाल्याचेही समजते.


दोघांपैकी एकाला प्राधान्य आवश्यक कारण...


आता रिटेंशन ठेवावं की लिलावाला प्राधान्य द्यावं या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहे. रिटेन करणाऱ्या खेळाडूंची संख्या अधिक ठेवल्यास लिलावामध्ये कमी खेळाडू उपलब्ध होतील. तसेच लिलाव घ्यायचा असेल तर अधिक खेळाडू उपलब्ध व्हावेत म्हणून रिटेंशनसाठीची मर्यादा फारच कमी ठेवावी लागेल.


काव्य मारन यांचा शाहरुखला सपोर्ट


दरम्यान या वादानंतर काव्या मारन यांनी या वादानंतर आपली भूमिका मांडली. शाहरुखने मांडलेल्या मुद्द्यावरुन सनरायझर्स हैदराबादच्या मालकीण काव्या मारन यांनी सहमत दर्शवली. संघ बांधणीसाठी लागणारा वेळ आणि खेळाडू एकत्रमेकांबरोबर कम्फर्टेबल होण्यासाठीही वेळ लागतो असे मुद्दे काव्या यांनी मांडले. खेळाडूंना तयार करण्यासाठी पैसे आणि वेळ दोन्ही द्यावे लागतात. त्यामुळे रिटेन करणाऱ्या खेळाडूंची संख्या अधिक असायला हवी, असं काव्या मारन म्हणाल्या. 


कोणकोण होतं उपस्थित?


या बैठकीला दिल्ली कॅपिटल्सचे किरण कुमार गांधी आणि पार्थ जिंदाल, लखनऊ सुपर जायंट्सचे संजीव गोयंका, चेन्नई सुपर किंग्जचे रुपा गुरुनाथ, राजस्थान रॉयल्सचे मनोज बडाले, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे प्रथमेश मिश्रा उपस्थीत होते. मुंबई इंडियन्सच्या मालकांनी म्हणजे अंबानींनी ऑनलाइन माध्यमातून बैठकीला हजेरी लावली.