Shahid Afridi On Shaheen Afridi: भारतात झालेल्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पाकिस्तानी संघामध्ये अभूतपूर्व बदल करण्यात आले आहेत. पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने संपूर्ण निवड समितीच बदलली. तसेच बाबर आझमऐवजी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदाला टी-20 क्रिकेट संघाचा कर्णधार करण्यात आलं. मात्र या निवडीसंदर्भात पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि शाहीन शाह आफ्रिदीचा सासरा असलेल्या शाहीद आफ्रिदीने मजेदार शब्दात टोला लगावला आहे. आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेआधी शाहीन शाह आफ्रिदीसंदर्भात शाहीद आफ्रिदीने प्रतिक्रिया नोंदवली आहे. मोहम्मद रिझवानबद्दल बोलताना शाहीद आफ्रिदीने जावयाची खिल्ली उडवली.


कौतुकाचा वर्षाव...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका कार्यक्रमाला शाहीद आफ्रिदी उपस्थित होता. या कार्यक्रमात मोहम्मद रिझवान, शाहीन शाह आफ्रिदी आणि वेगवान गोलंदाज हरीस रौफ आणि विकेटकीपर बॅट्समन सरफराज अहमद उपस्थित होते. शाहीद आफ्रिदी रिझवानचं कौतुक करत होता. शाहीद आफ्रिदी वर्ल्ड कपमध्ये रिझवानने कशी कामगिरी केली याबद्दल भरभरुन बोलला. "ज्या पद्धतीची मेहनत आणि फोकस त्याचा होता तो फारच कौतुकास्पद होता. त्याची एक बाब सर्वात उत्तम आहे ती म्हणजे तो त्याच्या कामावर फोकस असतो. कोण काय करतंय याकडे त्याचं लक्ष नसतं. तो एक उत्तम फायटर आहे," असं शाहीद आफ्रिदी म्हणाला.


शाहीनच्या कर्णधारपदावरुन टोला


मोहम्मद रिझवानबद्दल बोलताना शाहीद आफ्रिदीने, "मला तर टी-20 मध्ये तो कर्णधार व्हावा असं वाटत होतं पण शाहीन (कर्णधार) झाला चुकून!" असं म्हणताच सर्वजण हसू लागले. स्वत: शाहीन शाह आफ्रिदीही हे म्हणणं ऐकून हसू लागला. 



बाबरचा तडकाफडकी राजीनामा


शाहीन शाह आफ्रिदी न्यूझीलंडविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेमध्ये पहिल्यांदा नेतृत्व करणार आहे. ही मालिका 12 जानेवारी पासून सुरु होत आहे. 12,14,17,19,21 तारखेला सामने खेळवले जाणार आहे. यंदाच्या वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीच्या दृष्टीने हे सामने महत्त्वाचे ठरणार आहे. वर्ल्ड कप 2023 नंतर बाबर आझमने सर्व प्रकारच्या कर्णधारपदावरुन राजीनामा दिला. बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघाला नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. पाकिस्तानचा संघ साखळी फेरीमध्येच बाहेर पडला. मायदेशी परतल्यानंतर बाबरने तडकाफडकी आपल्या नेतृत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाने 3 वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी 3 वेगवेगळे कर्णधार नेमले.