मुंबई : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी हा सध्या त्याच्या आत्मचरित्रातल्या वादामुळे चर्चेत आहे. पुस्तकात लिहिलेल्या काही गोष्टींवरून अनेकजण नाराज आहेत. एवढच नाही तर आफ्रिदीने त्याच्या वयाविषयीही पुस्तकात खुलासा केला आहे. आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इम्रान फरहातने आफ्रिदीवर गंभीर आरोप केले आहेत. आफ्रिदीने स्वत:च्या स्वार्थासाठी अनेक खेळाडूंची कारकिर्द संपवल्याचं इम्रान फरहात म्हणाला.


मियांदादपासून गंभीरवर टीका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आफ्रिदीने त्याचं आत्मचरित्र 'गेम चेंजर'मध्ये अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. २०१० सालच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचे पुरावे तेव्हाचा प्रशिक्षक वकार युनूसकडे होते. तरी वकारने कोणतीच कारवाई केली नाही, असं आफ्रिदी या पुस्तकात म्हणाला आहे. याचबरोबर आफ्रिदीने जावेद मियांदाद आणि गौतम गंभीरवरही टीका केली आहे.


'पाकिस्तानात ये उपचार करतो'; आफ्रिदी-गंभीरमध्ये वादावादी सुरूच


इम्रान फरहातचा निशाणा


पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू इम्रान फरहातने ट्विट करून आफ्रिदीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. 'आफ्रिदीच्या पुस्तकाबद्दल जेवढं ऐकलं आणि वाचलं आहे, ते लाजीरवाणं आहे. एक खेळाडू ज्याने आपल्या वयाबद्दल २० वर्ष खोटं सांगितलं आणि आता तो आमच्या काही दिग्गज खेळाडूंना दोष देत आहे. माझ्याकडे या तथाकथित संताबद्दल अनेक कहाण्या आहेत, ज्याच्याबरोबर खेळण्याचं सौभाग्य आम्हाला मिळालं. त्याच्यामध्ये नेता बनण्याचेही गुण आहेत.'



'माझ्याकडे सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. या पुस्तकात ज्यांच्याबद्दल वाईट लिहिण्यात आलं आहे, त्यांनी पुढे येऊन या स्वार्थी खेळाडूचं खरं रुप सगळ्यांना सांगावं, असा आग्रह मी करतो. आफ्रिदीने अनेक खेळाडूंची कारकिर्द संपवून टाकली,' असं दुसरं ट्विट इम्रान फरहातने केलं आहे.



याआधी स्पॉट फिक्सिंग प्रकरणातला दोषी खेळाडू सलमान बट यानेही आफ्रिदीवर स्वार्थी आणि कारकिर्द संपवल्याचा आरोप केला होता. २०१० सालच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणी ५ वर्षांच्या निलंबनाच्या कारवाईनंतरही २०१६ सालच्या टी-२० वर्ल्ड कप टीममध्ये सलमान बटची निवड करण्यास कर्णधार शाहिद आफ्रिदीने नकार दिला होता.