आशिया कपच्या निमित्ताने भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ गेल्या आठवड्यात आमने-सामने आले होते. 2022 टी-20 वर्ल्डकपनंतर पहिल्यांदाच दोन्ही संघ आपापसात भिडले. पारंपारिक प्रतिस्पर्धी असणारे हे दोन्ही संघ आमने-सामने आल्याचं क्रिकेटरसिकांनी ही मोठी पर्वणी होती. पाकिस्तानी गोलंदाज शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ आणि नसीम शाह भारतीय फलंदाजासाठी चांगलीच डोकेदुखी ठरले. पण हार्दिक पांड्या आणि ईशान किशान यांच्या जोरावर भारताने 266 धावा केल्या. पण पाऊस पडल्यामुळे भारताला गोलंदाजी करण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे हा सामना अनिर्णित राहिला. दरम्यान, सामन्यानंतर भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडू एकमेकांशी गप्पा मारत काही क्षणांचा आनंद लुटताना दिसले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज आणि 2011 वर्ल्डकप विजेच्या संघाचा सदस्य गौतम गंभीर याने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हटलं की, भारतीय संघ करोडो देशवासियांचं प्रतिनिधित्व करत आहे. अशा स्थितीत त्यांनी मैदानात ही मैत्री दाखवता कामा नये. 


"जेव्हा तुम्ही राष्ट्रीय संघासाठी मैदानात खेळता, तेव्हा तुम्ही मैत्री मैदानाबाहेर ठेवली पाहिजे. खेळ होणं गरजेचं आहे, मैत्री बाहेर ठेवा. दोन्ही बाजूंच्या खेळाडूंच्या डोळ्यात एक आक्रमकता दिसली पाहिजे," असं गौतम गंभीरने म्हटलं. पुढे त्याने सांगितलं की, 'सध्या प्रतिस्पर्धी संघाचे खेळाडू एकमेकांच्या पाठीवर थाप मारताना तसंच हसत गप्पा मारताना दिसतात. काही वर्षांपूर्वी हे चित्र अजिबात नव्हतं'.


गौतम गंभीरच्या या विधानावर पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने भाष्य केलं आहे. गौतम गंभीरच्या मताशी आपण अजिबात सहमत नसल्याचं त्याने म्हटलं आहे. "ते त्याचे विचार आहेत. मी वेगळ्या पद्धतीने विचार करतो. आम्ही क्रिकेटर आणि अॅम्बेसिडरही आहोत. आमचे संपूर्ण जगभरात चाहते आहेत. त्यामुळे मैत्री आणि आदराचा संदेश देणंही गरजेचं आहे. हो मैदानात आक्रमकता असते. पण मैदानाबाहेरही एक आयुष्य असतं," असं शाहिद आफ्रिदीने सांगितलं आहे. 


दरम्यान भारत आणि पाकिस्तान रविवारी पुन्हा एकदा आमने-सामने असणार आहेत. सुपर 4 साखळी फेरीत दोन्ही संघ भिडणार आहेत. दरम्यान यावेळी गौतम गंभीरने वर्ल्डकपमध्ये कोणता खेळाडू जास्त महत्त्वाची कामगिरी निभावू शकतो हेदेखील सांगितलं. 


"आपण युवराज सिंग, धोनी आणि माझ्या खेळीबद्दल बोलतो, पण प्रत्यक्षात झहीर खान होता, ज्याने संपूर्ण स्पर्धेचं वातावरण तयार केलं होतं. तुम्ही इंग्लंडविरुद्धची त्याची गोलंदाजी पाहिलीत तर त्याने अँड्र्यू स्ट्रॉसची विकेट मिळवली होती. तुम्ही वर्ल्डकप फायनलमधील त्याची गोलंदाजी पाहा. 5 ओव्हरमधील 4 मेडन ओव्हर टाकत त्याने 1 विकेट मिळवत 1 धाव दिली होती. अशाप्रकारे तुम्ही टोन सेट करता. म्हणूनच भारताला वर्ल्डकप जिंकायचा असेल तर मी जसप्रीत बुमराहच्या पलीकडे पाहू शकत नाही,", असं गौतम गंभीरने सांगितलं आहे.