शाहरुखची ती ऑफर आफ्रिदीनं नाकारली
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं शाहरुख खानची ऑफर नाकारली आहे.
मुंबई : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनं शाहरुख खानची ऑफर नाकारली आहे. कॅरेबियन प्रिमिअर लीगमध्ये आफ्रिदीनं शाहरुखच्या मालकीची टीम असलेल्या त्रिनबैगो नाईट रायडर्सकडून खेळण्यास नकार दिला आहे.
त्रिनबैगो नाईट रायडर्स ही टीम यंदाच्या कॅरेबियन प्रिमिअर लीगमध्ये प्ले ऑफमध्ये पोहोचणारी पहिली टीम ठरली आहे. प्ले ऑफच्या या मॅचमध्ये आफ्रिदीला खेळवण्यासाठी त्रिनबैगो रायडर्स आग्रही होते पण आफ्रिदीनं ही ऑफर धुडकावून लावली.
त्रिनबैगो रायडर्सकडून खेळण्याची ऑफर दिल्याबद्दल धन्यवाद पण माझ्याकडे वेळ नाही. मी आधीपासूनच वेगळ्या लीगमध्ये खेळत आहे. त्यामुळे नाईट रायडर्सबरोबर खेळणं अशक्य असल्याचं आफ्रिदी ट्विटरवर म्हणाला आहे.
आफ्रिदीनं इंग्लंडमध्ये टी २० क्रिकेट खेळताना नुकतच वादळी शतक झळकावलं होतं. यानंतर आफ्रिदीला त्रिनबैगो नाईट रायडर्सकडून खेळण्याबाबत विचारणा झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचं रेकॉर्ड आफ्रिदीच्या नावावर एकेकाळी होतं. श्रीलंकेविरुद्धच्या मॅचमध्ये आफ्रिदीनं ३७ बॉल्समध्ये शतक ठोकलं होतं. यानंतर न्यूझीलंडचा कोरे अंडरसन आणि दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सनं हे रेकॉर्ड मोडलं.