मुंबई : हिंदू असल्यामुळे पाकिस्तान टीममध्ये आपल्यावर भेदभाव झाल्याचा आरोप दानिश कनेरियाने केला आहे. पाकिस्तान क्रिकेटमधला हा वाद ताजा असतानाच शाहिद आफ्रिदीने धक्कादायक वक्तव्य केलं आहे. टीव्ही बघून माझी मुलगी आरती करत होती, म्हणून मी टीव्ही फोडला, असं शाहिद एका टीव्ही चॅनलशी बोलताना म्हणाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहिद आफ्रिदीच्या या वक्तव्यावर आता जोरदार टीका होत आहे. एका टीव्ही शोदरम्यान तू कधी टीव्ही फोडला आहेस का? असा प्रश्न आफ्रिदीला विचारण्यात आला. तेव्हा त्याने हो असं उत्तर दिलं. एक टीव्ही सीरियल बघून माझी मुलगी आरती करण्याची नक्कल करत होती, त्यावेळी मी टीव्ही फोडला, असं उत्तर आफ्रिदीने दिलं.



हा सगळा प्रकार माझ्या पत्नीमुळे घडला. काही वर्षांपूर्वी डेली सोप्स लोकप्रिय होते. माझी बायको जास्त टीव्ही बघायची नाही, पण ही सीरिय कधीच चुकवायची नाही. पत्नीला मी अनेकवेळा तू एकट्याने सीरियल बघत जा, मुलांना घेऊन सीरियल बघू नकोस, असं सांगितल्याचंही आफ्रिदी म्हणाला.


माझी एक मुलगी अंशा का अक्षा हे आता आठवत नाही, पण ती सीरियल बघताना हात हलवायला लागली. त्याला नेमकं काय म्हणतात? असं आफ्रिदीने एँकरला विचारलं. यावेळी एँकर आरती असं म्हणाली. हे बघून मला राग आला आणि मी टीव्ही फोडला, असं आफ्रिदीने सांगितलं. आफ्रिदीच्या या उत्तरानंतर तिकडे बसलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी टाळ्याही वाजवल्या.


काहीच दिवसांपूर्वी शोएब अख्तरने दानिश कनेरियाबाबत धक्कादायक खुलासा केला होता. दानिश कनेरिया हिंदू असल्यामुळे टीममधल्या काही खेळाडूंना त्याच्यासोबत जेवायलाही आक्षेप होता, असं शोएब अख्तर म्हणाला. शोएबच्या या वक्तव्याला कनेरियानेही दुजोरा दिला.