कराची : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 'भारताशी संबंध खराब होण्यामागे नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. जोपर्यंत मोदी सत्तेत आहेत, तोपर्यंत भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेट मॅच होणं शक्य नाही', असं वक्तव्य शाहिद आफ्रिदीने केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानी मीडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये शाहिद आफ्रिदी म्हणाला, 'मोदी सत्तेत असेपर्यंत आपल्याला काही उत्तर मिळेल, असं मला वाटत नाही. आता आपण त्यांची मानसिकता काय आहे, ते समजलो आहोत. दोन्ही देशांच्या जनतेला असं नको आहे. एक माणूस दोन्ही देशांच्या संबंधांना खराब करु शकतो.'


पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल)चं आयोजन पूर्णपणे पाकिस्तानमध्ये केल्याबद्दल आफ्रिदीने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं कौतुक केलं. 'पीएसएलचं पाकिस्तानमध्ये परतणं खूप मोठी गोष्ट आहे. श्रीलंका, बांगलादेशच्या टीम पाकिस्तानमध्ये आल्या. क्रिकेटचं पाकिस्तानमध्ये पुनरागमन झालं. आम्हाला क्रिकेट पाकिस्तानमध्ये पूर्णपणे परतण्याची अपेक्षा आहे. पीएसएल पाकिस्तानमध्ये आयोजित करणं मोठी उपलब्धी आहे,' अशी प्रतिक्रिया आफ्रिदीने दिली.


भारत आणि पाकिस्तान यांच्यात २००९ सालानंतर एकही द्विपक्षीय सीरिज झालेली नाही. पण दोन्ही देश आयसीसी स्पर्धा आणि आशिया कपमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात.