कलम ३७० रद्द झाल्यानंतर शाहिद आफ्रिदी बरळला
राज्यसभेमध्ये जम्मू-काश्मीरच्या प्रश्नावर ऐतिहासिक विधेयक मंजूर करण्यात आलं.
नवी दिल्ली : राज्यसभेमध्ये जम्मू-काश्मीरच्या प्रश्नावर ऐतिहासिक विधेयक मंजूर करण्यात आलं. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत प्रस्ताव मांडला. यानंतर राज्यसभेत यावर चर्चा झाली, या चर्चेनंतर जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याला राज्यसभेने मंजुरी दिली. आवाजी मतदानाने १२५ विरुद्ध ६१ अशा मताने कलम ३७० रद्द करण्यात आलं. कलम ३७० सोबतच कलम ३५ एदेखील रद्द करण्यात आलं आहे.
राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर आता मंगळवारी लोकसभेत हे विधेयक मांडलं जाणार आहे. लोकसभेमध्ये भाजपचं स्पष्ट बहुमत बघता हे विधेयक तिकडेही मंजूर होईल हे जवळपास निश्चित आहे.
जम्मू-काश्मीरबाबत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे. याविरोधात पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि संयुक्त राष्ट्रामध्ये जायच्या तयारीत आहे. तर भारताच्या या निर्णयाविरोधात पाकिस्तानमधूनही प्रतिक्रिया येत आहेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी या मुद्द्यावर बरळला आहे.
'संयुक्त राष्ट्राच्या ठरावानुसार काश्मिरींना त्यांचे अधिकार दिले पाहिजेत. आपल्यासारखेच स्वातंत्र्याचे अधिकार त्यांना मिळाले पाहिजेत. संयुक्त राष्ट्राची निर्मिती का झाली आहे? ते झोपलेले का आहेत? काश्मीरमध्ये होत असलेलं आक्रमण आणि गुन्हे माणुसकीविरोधात आहेत, याची नोंद घेतली गेली पाहिजे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे,' असं ट्विट शाहिद आफ्रिदीने केलं. आफ्रिदीने त्याच्या ट्विटमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही टॅग केलं आहे.