मोहम्मद शामीचे करिअर धोक्यात, या युवा खेळाडूंना मिळू शकते संधी
गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा म्हणाला होता की ज्यापद्धतीने भारतात वेगवान गोलंदाजीचा विकास होतोय ते भारतीय क्रिकेटसाठी शुभ संकेत देणारे आहे.
मुंबई : गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा म्हणाला होता की ज्यापद्धतीने भारतात वेगवान गोलंदाजीचा विकास होतोय ते भारतीय क्रिकेटसाठी शुभ संकेत देणारे आहे.
मॅकग्राने जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि मोहम्मद शमी सारख्या गोलंदाजांचे तोंडभरुन कौतुक केले. जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वकर कुमार यांनी वर्ल्ड क्रिकेटमध्ये आपली छाप पाडली. मात्र उमेश यादव कसोटी क्रिकेटपर्यंत सीमित राहिला. तर दुसरीकडे मोहम्मद शमीच्या पत्नीसोबतच्या विवादामुळे त्याचे करिअरही धोक्यात आलेय. यामुळे भारताच्या इतर युवा वेगवान गोलंदाजांना संधी मिळू शकते. असे काही युवा वेगवान गोलंदाज आहेत जे भविष्यात टीम इंडियाचा भाग होऊ शकतात.
शिवम मावी - नोएडामध्ये जन्मलेला १९ वर्षीय शिवम मावी यंदाच्या अंडर १९ वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघात होता. जानेवारी २०१८मध्ये त्याला कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या लिलावात खरेदी केले. उजव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या या क्रिकेटरने न्यूझीलंडमध्ये झालेल्या अंडर १९ वर्ल्डकपमध्ये ११ विकेट घेतल्या होत्या. मावी १४०च्या स्पीडने बॉल टाकतो. तसेच बॉल स्विंग करण्यात तो कुशल आहे. शिवमला एक ऑलराऊंडर म्हणूनही पाहिले जाऊ शकते.
अश्विन क्रिस्ट - अश्विन तामिळनाडूचा वेगवान गोलंदाजीमधील प्रमुख खेळाडू आहे. अश्विनने रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३५ विकेट मिळवल्यात. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतही त्याने २० विकेट घेतल्या होत्या. स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्यामुळए त्याला अंडर २३मध्ये भारताकडून खेळण्याची संधी मिळाली. क्रिस्टने २३ फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये ६९ विकेट मिळवल्या. त्याची सरासरी २८.८९ होती. २०१६मध्ये रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या सेमीफायलनध्ये क्रिस्टने कर्नाटकच्या सहा फलंदाजांना माघारी धाडले होते. मॅकग्रानेही क्रिस्टची स्तुती केली होती. त्यामुळे शमीच्या अनुपस्थितीत या युवा खेळाडूला भविष्यात संधी मिळण्याची शक्यता आहे.
कमलेश नागरकोटी - युवा वेगवान गोलंदाज कमलेश नागरकोटची यंदाच्या अंडर १९ वर्ल्डकपमध्ये चांगलीच चर्चा झाली. त्याने या वर्ल्डकपमध्ये १५० किमी प्रति तासाच्या वेगाने गोलंदाजी केली होती. अंडर १९मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याने फलंदाजांना सळो की पळो करुन सोडले होते. २०१६-१७मध्ये कमलेशने विजय हजारे ट्रॉफीमध्ये राजस्थानकडून पदार्पण केले होते. यंदाच्या आयपीएलमध्ये कमलेशला कोलकाता नाईट रायडर्सने ३.२ कोटींना विकत घेतले.
रजनीश गुरबानी - २८ जानेवारी १९९३मध्ये जन्मलेला रजनीश गुरबानी विदर्भसाठी खेळतो. फर्स्ट क्लासमध्ये ११ सामन्यांतील २० डावांत त्याने ५६ विकेट घेतल्या. यात ६८वर ७ विकेट अशी त्याची कामगिरी राहिलीये. रजनीशला यंग भुवनेश्वर म्हटले जाते.
नवदीप सैनी - आयपीएल २०१८च्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला युवा नवदीप सैनीला तीन कोटी रुपयांना विकत घेतले. हरियाणामध्ये जन्मलेला आणि दिल्लीकडून खेळणारा नवदीप सैनी डाव्या हाताने गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे. त्याने ३१ फर्स्ट क्लास सामन्यात ९६ विकेट घेतल्यात. त्याचा इकॉनॉमी रेट २.७८ राहिलाय. आयपीएलमध्ये त्याने चांगली कामगिरी केल्यास टीम इंडियामध्ये त्याला संधी मिळू शकते.
या सर्व खेळाडूंचे वय आता कमी आहे आणि त्यांना स्वत:ला अद्याप सिद्ध करायचे आहे. आता हे बघावं लागेल की आयपीएलमध्ये कोण स्वत:ची छाप पाडेल आणि टीम इंडियामध्ये जागा मिळवण्यास सफल ठरतो.