सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टी-२०मध्ये भारताचा ६ विकेटनं विजय झाला. याचबरोबर भारतानं ३ टी-२० मॅचची सीरिज बरोबरीत सोडवली. पहिल्या टी-२० मॅचमध्ये पराभव झाल्यानंतर दुसरी टी-२० मॅच पावसामुळे रद्द झाली. यामुळे या मॅचमध्ये जिंकून सीरिज वाचवण्याचं आव्हान भारतापुढे होतं. विराट कोहलीच्या टीमनं हे आव्हान लिलया पेललं. २०१८ या वर्षातली भारताची ही शेवटची टी-२० मॅच होती. टी-२० क्रिकेटमधला या वर्षाचा शेवट भारतानं गोड केला.


शिखर धवनच्या सर्वाधिक रन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१८ या वर्षात टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंमध्ये शिखर धवनचा पहिला क्रमांक लागतो. शिखर धवननं १८ मॅचच्या १७ इनिंगमध्ये ४०.५२ ची सरासरी आणि १४७.२२ च्या स्ट्राईक रेटनं ६८९ रन केले. यामध्ये ६ अर्धशतकांचा समावेश आहे. २०१८ मध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित शर्माचा दुसरा क्रमांक लागतो. रोहितनं यावर्षी १९ मॅचच्या १८ इनिंगमध्ये ३६.८७ ची सरासरी आणि १४७.५०च्या स्ट्राईक रेटनं ५९० रन केले. रोहितनं यावर्षी २ शतकं आणि ३ अर्धशतकंही केली.


शिखर धवन आणि रोहितनंतर या यादीमध्ये पाकिस्तानच्या फकर झमान आणि बाबर आझमचा नंबर लागतो. फकर झमाननं १७ मॅचमध्ये ५७६ आणि बाबर आझमनं १२ मॅचमध्ये ५६३ रन केले.


टी-२०मध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत लोकेश राहुल १५व्या क्रमांकावर आहे. राहुलनं यावर्षी १३ मॅचच्या ११ इनिंगमध्ये ३२४ रन केले.


२०१८ साली वनडे आणि टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन करणारा भारताचा कर्णधार विराट कोहली या यादीमध्ये ३१ व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. विराटच्या पुढे भारताचे मनिष पांडे आणि सुरेश रैना आहेत. मनिष पांडेनं १३ मॅचच्या ११ इनिंगमध्ये २९९ रन केले, तर सुरेश रैनानं १३ मॅच आणि ११ इनिंगमध्ये २९८ रन केले. २०१८मध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत मनिष पांडे १६व्या आणि सुरेश रैना १७व्या क्रमांकवर आहे.


विराट कोहलीनं २०१८ मध्ये १० टी-२० मॅचच्या ९ इनिंगमध्ये ३०.१४ ची सरासरी आणि १२१.९६ च्या स्ट्राईक रेटनं २११ रन केले. यावर्षी विराट कोहलीला टी-२० मॅचमध्ये एकच अर्धशतक करता आलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या टी-२०मध्ये विराटनं ४१ बॉलमध्ये ६१ रनची खेळी केली.