सगळ्यात जलद १२ शतकं आणि ४ हजार रन्स, शिखर धवन दुसरा भारतीय
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८ विकेट्सनं शानदार विजय झाला.
विशाखापट्टणम : श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये भारताचा ८ विकेट्सनं शानदार विजय झाला. या विजयाबरोबरच भारतानं ३ वनडेची सीरिज २-१नं जिंकली. तिसऱ्या वनडेमध्ये भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरला शिखर धवन. धवननं ८५ बॉल्समध्ये १०० रन्सची खेळी केली. या खेळीमध्ये धवननं १३ फोर आणि २ सिक्स लगावले. श्रेयस अय्यरसोबत धवननं १३५ रन्सची महत्त्वपूर्ण पार्टनरशीप केली.
या मॅचमध्ये शिखर धवननं वनडे क्रिकेटमध्ये ४ हजार रन्स पूर्ण केल्या आहेत. धवननं ९५ इनिंगमध्ये ४ हजार रन्स केल्या. एवढ्या जलद ४ हजार रन्स पूर्ण करणाऱ्या भारतीयांमध्ये धवन दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद ४ हजार रन्सचा टप्पा गाठणारा भारतीय विराट कोहली आहे.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद ४ हजार रन्स पूर्ण केले ते दक्षिण आफ्रिकेच्या हाशीम आमलानं. आमलानं ८१ इनिंगमध्ये ४ हजार रन्स पूर्ण केल्या होत्या. दुसऱ्या क्रमांकावर व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी ८८ इनिंगमध्ये, तिसऱ्या क्रमांकावर जो रुट आणि चौथ्या क्रमांकावर विराट कोहलीचा नंबर लागतो. या यादीमध्ये शिखर धवन सहाव्या क्रमांकावर आहे.
१२ शतकंही जलद
वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १२ शतकं लगावण्याऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये धवन पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. धवननं ९५ इनिंगमध्ये १२ शतकं लगावली आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डिकॉकनं वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १२ शतकं लगावली आहेत.
डिकॉकनं ७४ इनिंगमध्ये १२ वनडे शतकं लगावली होती. दुसऱ्या क्रमांकावर हाशीम आमला आहे. आमलानं ८१ इनिंगमध्ये हे रेकॉर्ड केलं होतं, तर विराटनं ८३ इनिंगमध्ये १२ शतकं पूर्ण केली होती.