नवी दिल्ली : येत्या जुलै महिन्यात टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या ठिकाणी टीम इंडिया ४ टेस्ट मॅचेसची सीरिज खेळणार आहे. आतापर्यंतच्या सीरिजमध्ये टीम इंडियाला केवळ ३ वेळाच इंग्लंडमध्ये यश मिळालं आहे. भारतीय टीमला बहुतेक वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आफ्रिकन दौऱ्यानंतर टीम इंडियाकडून क्रीडाप्रेमींना खूपच अपेक्षा आहेत. त्यातच आता टीम इंडियाचा ओपनर बॅट्समन शिखर धवनने एक महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. शिखर धवनच्या मते, टीम इंडियाला इंग्लंडमध्ये विजय मिळवायचा असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.


भारतीय टीमला इंग्लंड दौऱ्यात चांगली कामगिरी करायची असेल तर लवकरच तयारीला लागलं पाहिजे. तसेच इंग्लंडमधील पिचचा अभ्यास भारतीय टीमला करणं गरजेचं आहे असं मतं शिखर धवनने व्यक्त केलं आहे.


एका कार्यक्रमात शिखरने म्हटलं की, इंग्लंड विरोधातील सीरिज थोडी कठीण असणार आहे. मात्र, आपल्याला अशा प्रकारच्या पिचचा लवकरच अभ्यास करायला हवा. जर, तयारी चांगली राहीली आणि आम्ही आपला सर्वोत्कृष्ट परफॉरमन्स दिला तर नक्कीच विजय मिळेल.


वन-डे आणि टी-२० सीरिजमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे शिखर धवनला ए प्लस कॅटेगरी मिळण्यास मदत झाली. शिखर धवनने प्रतिक्रिया देताना म्हटलं, "मी परदेशात चांगली कामगिरी करु शकत नव्हतो. मात्र, वन-डे आणि टी-२० सीरिजमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे. यामुळे मला ए प्लस करार मिळण्यास मदत झाली आहे. दक्षिण आफ्रिकेत अशा प्रकारचं प्रदर्शन करणं म्हणजे स्वप्न खरं झाल्यासारखं आहे."