माझ्यावर तुम्ही नाराज असाल... शिखर धवननं माफी मागितली
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला.
लंडन : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये भारताचा पराभव झाला. इंग्लंडचा विजय झाला असला तरी ही मॅच अत्यंत रोमहर्षक झाली. या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये विराटनं १४९ रनची तर दुसऱ्या इनिंगमध्ये ५१ रनची खेळी केली. विराट कोहलीच्या या शानदार खेळीनंतरही भारताच्या इतर बॅट्समननी निराशा केल्यामुळे या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला. या मॅचमध्ये एकटा विराट कोहली संघर्ष करताना दिसला.
चौथ्या इनिंगमध्ये इंग्लंडनं भारताला विजयासाठी १९४ रनचं लक्ष्य ठेवलं पण भारताचा १६२ रनमध्ये ऑल आऊट झाला. या मॅचनंतर शिखर धवनच्या बॅटिंगवर आणि त्याच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. एसेक्सविरुद्धच्या सराव सामन्यामध्ये दोन वेळा शून्यवर बाद झाल्यानंतरही धवनला पहिल्या टेस्टमध्ये संधी का देण्यात आली अशी टीका होत आहे.
या सगळ्या टीकेवर खुद्द शिखर धवननं प्रतिक्रिया दिली आहे. खराब कामगिरीनंतर शिखर धवननं आत्मचिंतनाचं ट्विट केलं आहे. पराभवामुळे तुम्ही नाराज आणि दु:खी आहात हे मला माहिती आहे. पहिल्या टेस्टमध्ये माझ्या काय चुका झाल्या त्याचं मी आत्मपरिक्षण केलं आहे. पुढच्या सामन्यामध्ये मी जोरदार पुनरागमन करीन. तुमचं प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद, असं ट्विट शिखर धवननं केलं आहे.
पहिल्या टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये धवननं २६ आणि १३ रनची खेळी केली. दुसऱ्या टेस्ट मॅचला ९ ऑगस्टपासून लॉर्ड्सवर सुरुवात होणार आहे.