शिखर धवनच्या आयुष्यात परतणार आनंदाचे क्षण; विभक्त पत्नीला दणका
Shikhar Dhawan : क्रिकेटपटू शिखर धवन गेल्या काही काळापासून क्रिकेट जगतात चर्चेत असला तरीही तो खासगी आयुष्यात मात्र काहीशा अडचणींचा सामना करताना दिसला. आता मात्र...
Shikhar Dhawan wife Ayesha Mukherjee: एखादी व्यक्ती त्याच्या कार्यक्षेत्रात कितीही पुढे गेली तरीही त्याच्या किंवा तिच्या खासगी जीवनात अस्थैर्य असल्यास समोर येणारं प्रत्येक आव्हान हे खच्चीकरण करणारं असतं. तरीही परिस्थितीच्या नाकावर टिच्चून उभं राहणारेही अनेकजण असतात. क्रिकेटपटू शिखर धवनचं (Shikhar Dhawan) नावही अशा व्यक्तींमध्ये येतं. कारण, क्रिकेट जगतामध्ये तो कितीही नाव कमवत असला तरीही खासगी आयुष्यात मात्र कुटुंबाचं दूर असणं, मुलाचं जवळ नसणं मात्र त्याला सतावणारं होतं.
एकिकडे शिखर त्याच्या जीवनातील लहानमोठ्या गोष्टींमध्ये आनंद शोधत असतानाच आताच हाच आनंद त्याच्या आयुष्यात परतणार असल्याचं म्हटलं जात आहे. शिखर आणि त्याची पत्नी, आएशा हे दोघंही वैवाहिक नात्यातून विभक्त झाले असून, सध्याच्या त्यांच्या घटस्फोटाचा खटला सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. 2021 पासून हा खटला सुरू असून, साधारण 2020 पासून तो पत्नीपासून वेगळा राहत आहे.
इतकंच नव्हे, तर जवळपास तीन वर्षांपासून तो मुलगा झोरावर यालाही भेटलेला नाही. आता मात्र त्याला लेकाची भेट घेण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाहीये. कारण, पटियाला सत्र न्यायालयानं आएशा मुखर्जीला आदेश देत 9 वर्षीय झोरावरला कुटुंबाशी भेट घडवण्यासाठी भारतात आणण्यास सांगितलं आहे.
न्यायालयामुळं आएशाला दणका, शिखरला दिलासा...
शिखरपासून विभक्त झाल्यापासून आएशा मुखर्जी ऑस्ट्रेलियामध्ये वास्तव्यास असल्याचं सांगण्यात आलं आहे. मुळात आएशाचं ऑस्ट्रेलियात असणं ठीक पण, तिचं मुलाला कुटुंबाशी भेट करु न देणं न्यायालयालाही पटलं नसून, त्यावर आता नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. शिखर 2020 पासून मुलाला भेटलेला नाही. किंबहुना मुलावर एकट्या आईचा हक्क नाही. आतापर्यंत त्यानं कायम एक चांगला पिता होत मुलाची काळजी घेतली आहे, मग त्याला मुलाला भेटण्यास हरकत का? असा थेट सवाल न्यायालयानं केल्याचं म्हटलं जात आहे.
शिखरनं मुलाचा पूर्ण ताबा मागितलेला नाही, पण त्याची भेट घेण्याची इच्छा मात्र व्यक्त केली आहे. हे प्रकरण लक्षात घेत आता न्यायालयानं आएशाला झोरावरला घेऊन भारतात येण्याचे किंवा कोणा विश्वासार्ह व्यक्तीसोबत त्याला भारतात पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.
न्यायालयानं सांगितल्यानुसार 28 जून रोजी रात्री 10 वाजता दिल्लीमध्ये मुलाचा ताबा धवन कुटुंबाकडे देणं अपेक्षित असून, तिला यावर काहीही हरकत असल्याच पुढील 72 तासांमध्ये ती व्यक्त करावी असंही न्यायालयानं सांगितलं. असं झाल्यास शिखर धवन मुलाला भारतात आणेल आणि आएशा मुलाच्या व्हिसासह तत्सम कागदोपत्री व्यवहारांच्या पूर्ततेची जबाबदारी घेईल. 27 जून ते 4 जुलैपर्यंत झोरावर भारतात राहील अशी व्यवस्था करण्याच्या सूचना न्यायालयानं दिल्या असून, या दरम्यान मुलाच्या प्रवासखर्चाची जबाबदारी शिखरचीच असेल ही बाब लक्षात घ्यावी.