नवी दिल्ली : भारत आणि बांगलादेश यांच्यात पहिली टी-२० मॅच उद्या खेळवण्यात येणार आहे. या मॅचमध्ये मुंबईचा ऑल राऊंडर शिवम दुबेचं पदार्पण व्हायची शक्यता आहे. कर्णधार रोहित शर्माने तसे संकेत दिले आहेत. विराट कोहलीने विश्रांती घेतल्यामुळे रोहित शर्माकडे टीमचं नेतृत्व देण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'टीममध्ये अनेक पर्याय उपलब्ध आहेत. आम्हाला तरुण खेळाडूंना संधी देणं गरजेचं आहे. त्यामुळे ते कसे खेळतात ते बघता येईल. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये फरक असतो. दोन्हींमध्ये वेगळी आव्हानं असतात. शिवमला पहिल्यांदाच भारतीय टीममध्ये निवडण्यात आलं आहे. दरवाजे सगळ्यांसाठी उघडे आहेत. कोणीही कोणत्याही वेळी खेळू शकतं. विकेट कीपर ऋषभ पंतला योग्य संधी दिली जाईल,' असं रोहित म्हणाला.


ऋषभ पंतसोबतच टी-२० सीरिजसाठी विकेट कीपर संजू सॅमसनचीही निवड करण्यात आली आहे. मग संधी कोणाला मिळणार? असा प्रश्न रोहितला विचारण्यात आला. तेव्हा पंत अनुभवी आहे आणि त्याला संधी द्यायची गरज आहे. आमचे दोन्ही विकेट कीपरकडे प्रतिभा आहे. पण पंतने टी-२०मध्ये त्याची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने फक्त १०-१५ मॅच खेळल्या आहेत, त्यामुळे त्याला आणखी संधी मिळाली पाहिजे. एवढ्या लवकर त्याच्याबद्दल मत बनवणं चुकीचं ठरेल, अशी प्रतिक्रिया रोहितने दिली.


भारतीय टी-२० टीम


रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या, युझवेंद्र चहल, राहुल चहर, दीपक चहर, खलील अहमद, शिवम दुबे, शार्दुल ठाकूर