पाकिस्तानचा माजी जलदगती अंदाज शोएब अख्तर हा त्याच्या काळातील धोकादायक गोलंदाजांपैकी एक होता. रावळपिंडी एक्स्प्रेस नावाने ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरच्या गोलंदाजीने अनेक संघांच्या फलंदाजांना घाम फोडला होता. तब्बल दोन दशकं शोएब अख्तरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीने दबदबा निर्माण केला होता. शोएब अख्तरने निवृत्ती जाहीर केल्यानंतर सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग अशा महान फलंदाजांनीही तो सर्वाधिक आव्हानात्मक गोलंदाज असल्याचं मान्य केलं होतं. दरम्यान, मैदानात खेळत असताना शोएब अख्तर अनेक खेळाडूंशी भिडत पंगा घेत असे. एकदा तर त्याने मैदानात एका खेळाडूला थेट जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानेच स्वत: हा खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शोएब अख्तरने युट्यूब चॅनेल सुरु केलं असून, यामध्ये तो पाकिस्तानी सामने आणि आंतरराष्ट्रीय तसंच लीग सामन्यांवर विश्लेषण करत असतो. यावरील एका शोमध्ये त्याने कशाप्रकारे आपण न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्यूलमला जीवे मारण्याची धमकी दिली होती याचा खुलासा केला. गोलंदाजी करताना ब्रेंडन मॅक्यूलम पुढे येऊन खेळत असल्याने शोएब अख्तरने ही धमकी दिली होती. 


"एकदा माझ्याविरोधात खेळताना मॅक्यूलम पिचवर पुढे येऊन फलंदाजी करत होता. मी त्याला विचारलं होतं की, तुझी नजर चांगली आहे ना? तो म्हणाला, हो आहे, का काय झालं? त्यावर मी त्याला म्हणालो होतो मी तुला शोएब मलिक दिसतोय का? तू असं पुढे येऊन मारु शकत नाहीस. मी थेट तुझ्या डोक्यावर बॉल टाकेन. मी तुला मारुन टाकेन. इथे नाही मारलं तर हॉटेलमध्ये येऊन नक्की मारुन टाकेन. मी नक्कीच तुझी हत्या करेन", असा खुलासा शोएब अख्तरने 'Wake up with Sorabh' या युट्यूब चॅनेलवर केला आहे. 


दरम्यान, गुडघ्याच्या दुखापतींमुळे अख्तरची कारकीर्द दुर्दैवाने लवकर संपली. मी नेहमीच क्रिकेटच्या मैदानावर आपले 100 टक्के दिले असल्याचं शोएब अख्तर सांगतो. आपण ग्लॅडिएटर असल्याचंही तो सांगतो. 


शोएब अख्तरने म्हटलं आहे की "मी कदाचित क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान गोलंदाज होऊ शकलो असतो. पण माझ्या गुडघ्याने साथ दिली नाही. माझी शारीरिक तंदुरुस्ती अशी होती की मला वेदना होत होत्या. मला एकूण 12 ऑपरेशन्सना सामोरं जावं लागलं. त्यात गेल्यावर्षी गुडघ्याचं प्रत्यार्पणही होतं. मी अद्यापही संघर्ष करत आहे. पण आधुनिक काळातील ग्लॅडिएटरप्रमाणे नेहमी वेगाने धावणे आणि चांगली कामगिरी करणे यावर विश्वास ठेवत होतो. मी कोण होतो हे लोकांच्या लक्षात राहायला हवं असं मला नेहमी वाटतं".