शोएब अख्तरचा `कोरोना`आडून काश्मिरी राग
जगभरामध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातलेला असताना पाकिस्तान मात्र अजूनही जुन्याच मानसिकतेत असल्याचं दिसत आहे.
मुंबई : जगभरामध्ये कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातलेला असताना पाकिस्तान मात्र अजूनही जुन्याच मानसिकतेत असल्याचं दिसत आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने कोरोनाच्या आडून काश्मिरी राग आळवला आहे. याबाबतचं एक ट्विट शोएब अख्तरने केलं आहे.
'लॉकडाऊन कसं वाटत आहे?' असा सवाल शोएबने त्याच्या ट्विटमध्ये केला आहे. या प्रश्नाखाली शोएबने काश्मीर असं लिहिलं आहे. काहीच दिवसांपूर्वी शोएब अख्तरने कोरोनावरुन चीनवर लक्ष्य केलं होतं. तुम्ही वटवाघूळ, कुत्रे आणि मांजरी कसे खाऊ शकता?, असं शोएब त्याच्या युट्यूब चॅनलवर म्हणाला होता. वाद वाढल्यानंतर शोएबने त्याच्या व्हिडिओचा भाग एडिट केला होता.
शोएब अख्तरला त्याच्या या ट्विटनंतर ट्रोल करण्यात येत आहे. पाकिस्तानमधली दहशतवाद्यांची फॅक्ट्री कशी चालली आहे? पाकिस्तानमध्ये मॅच फिक्सिंगची काय परिस्थिती आहे? असे प्रश्न चाहत्यांनी शोएबला विचारले आहेत.
कोरोना व्हायरसमुळे शोएब अख्तर चीनवर भडकला
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढाकाराने झालेल्या सार्क परिषदेतही पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा उकरून काढला. कोरोनाचा सामना करण्यासाठी मोदींनी व्हिडिओ कॉन्परन्सिंगच्या माध्यमातून सार्क देशांच्या प्रमुखांशी संवाद साधला. या बैठकीत पाकिस्तानने मात्र तिरपी चाल चालली आणि पुन्हा एकदा जम्मू- काश्मीरचाच पाढा गिरवला. पाकिस्तनचे आरोग्य मंत्री जफर मिर्झा यांनी काश्मीर मुद्दा अधोरेखित करत त्या ठिकाणच्या नागरिकांवर लावण्यात आलेले निर्बंध हटवण्यात यावेत अशी मागणी केली.
मिर्झा यांनी याच परिषदेत जम्मू काश्मीर येथेही कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून आल्याचं म्हणत सावधगिरी म्हणून या भागात लावण्यात आलेले निर्बंध तातडीने हटवावेत अशी मागणी केली.