मुंबई : मागच्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्ताननं भारताचा पराभव केला. भारताच्या पराभवानंतर पाकिस्तानी खेळाडू शोएब मलिक आणि विराट कोहली, युवराज सिंगचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये तिन्ही खेळाडू हसताना दिसत होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भारतीय खेळाडूंवर टीकेची झोड उठली होती. पाकिस्तानविरुद्धच्या लाजीरवाण्या पराभवानंतर खेळाडू हसू कसे शकतात असा सवाल विचारण्यात आला होता. या मॅचमध्ये भारताचा १८० रननी पराभव झाला होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मॅचनंतरच्या प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये शोएब मलिक, विराट कोहली आणि युवराज सिंग हसताना दिसत होते. या सगळ्याप्रकरणावरून आता शोएब मलिकनं पडदा उठवला आहे. सईद अजमलनं क्रिस गेलच्या सोडलेल्या कॅचचा किस्सा मी त्या दोघांना सांगत होतो. यावरूनच ते हसत होते, असं शोएब मलिक म्हणालाय.


पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजच्या मॅचमध्ये क्रिस गेलचा कॅच पकडण्यासाठी शोएब मलिक आणि सईद अजमल गेले होते. कॅच पकडण्यासाठी हे दोघं एकमेकांच्या भरवशावर राहिले आणि दोघांनी तो कॅच सोडला होता. याचाच किस्सा मलिकनं कोहली आणि युवराजला सांगितला. जर तू कॅच पकडण्यासाठी आला होतास तर शेवटच्या क्षणी बॉल सोडला असतास का? असं मी अजमलला विचारलं तेव्हा जर तू कॅच सोडला असतास तर मी तो कॅच पकडला असता, असं अजमलनं मला सांगितल्याचं शोएबनं विराट-युवीला सांगितलं. त्यावरून विराट आणि युवराजला हसू आल्याचं शोएबनं सांगितलं.


चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. पाकिस्ताननं पहिले बॅटिंग करत ४ विकेट गमावून ३३८ रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय टीम १५८ रनवर ऑल आऊट झाली. आणि भारतानं हा सामना १८० रननं गमावला.