सानिया मिर्झा शोएब मलिकची पहिली पत्नी नव्हतीच; जाणून घ्या `ती` महिला कोण? जगापासून लपलेलं रहस्य
पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब मलिकने 2010 मध्ये सानिया मिर्झाशी लग्नगाठ बांधली होती. पण अनेकांना माहिती नाही की, शोएब मलिकचं हे दुसरं लग्न होतं. 2002 मध्ये त्याने आयेशा सिद्धीकीशी विवाह केला होता.
पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब मलिकने सना जावेदशी लग्न करत क्रिकेटविश्वाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. सना जावेदशी कोणतेही संबंध नाहीत असा दावा करणाऱ्या शोएब मलिकने अचानक इंस्टाग्रामला फोटो शेअर करत आपण तिच्याशी विवाहबद्ध झाल्याची घोषणा केली. यासह त्याने सानिया मिर्झाला घटस्फोट दिला असल्याच्या वृत्तावरही शिक्कामोर्तब केलं. सानिया मिर्झाच्या कुटुंबानेही सोशल मीडियाच्या माध्यमातून याला दुजोरा दिला आहे. पण अनेकांनी माहिती नाही, की सानिया मिर्झा ही शोएब मलिकची पहिली पत्नी नाही. शोएब मलिकने 2010 मध्ये सानिया मिर्झाशी लग्नगाठ बांधली. त्यांना एक मुलगा आहे. पण रिपोर्टनुसार, शोएब मलिकला सानिया मिर्झाशी निकाह करण्याआधी पहिल्या पत्नीला घटस्फोट द्यावा लागला होता.
शोएब मलिकने 2010 मध्ये सानिया मिर्झाशी लग्न करत असल्याची घोषणा केल्यानंतर एक वाद निर्माण झाला होता. हैदराबादमधील आयेशा सिद्धीकी नावाच्या एका महिलेने 2002 मध्ये आपलं शोएब मलिकशी लग्न झाल्याचा दावा केला होता. शोएब मलिकने हे दावे फेटाळले होते. तर दुसरीकडे आयेशा सिद्धीकीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत पुरावे म्हणून लग्नाचे व्हिडीओ दाखवले होते. आयेशा सिद्धीकीला महा सिद्धीकी नावानेही ओळखलं जात होतं.
यानंतर शोएब मलिक आणि आयेशा सिद्धीकी यांनी सामंजस्याने हा वाद सोडवला. शोएब मलिकला पोटगी म्हणून आयेशाला 15 कोटी द्यावे लागले असं सांगण्यात आलं.
यातील सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे, आयेशा आणि शोएब यांचा निकाह फोनवरुन पार पडला होता. टाइम्स न्यूज नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत शोएब मलिकने आपण होणाऱ्या पत्नीला न पाहताच फोनवरुन निकाह केल्याचं सांगितलं होतं. त्यावेळी शोएब मलिक फक्त 20 वर्षांचा होता. त्याच्याकडे आयेशाचे काही फोटो होते. दोघेही सतत फोनवरुन बोलायचे. अखेर शोएबने फोनवरुन आयेशाशी निकाह केला. पण फोटोत दिसणारी तरुणी वेगळीच होते हे सत्य शोएबला उशिरा कळलं.
आयेशा शोएबला भेटण्यासाठी नकार देत सतत काहीतरी कारणं सांगत होती. दुसरीकडे आपल्या नात्याची चर्चा बातम्यांमध्ये होत असून, यामुळे कुटुंबाला अडचणींचा सामना करावा लागत आहे असं सांगत आयेशाने त्याला लग्नाची गळ घातली होती.
"2002 मध्ये हे सगळं झालं होतं. आयेशाला लग्न करायचं होतं. मलाही लग्न करायचं होतं, पण त्यासाठी घाई करण्याची इच्छा नव्हती. पहिली बाब म्हणजे मी तिला भेटलोच नव्हतो. तिने आपण फोनवरुन निकाह करु शकतो असं सुचवलं. मी फोनवरुन निकाह करावं अशी पालकांची इच्छा नसल्याने, मी त्यांना याबद्दल सांगण्याचा प्रश्नच नव्हता. मी त्यावेळी फक्त 20 वर्षांचा होतो. त्यात आयेशा लोकांना आपल्याबद्दल कळलं असल्याने हैदराबादमध्ये कुटुंबाला अडचणींचा सामना करावा लागत आहे सांगत दबाव टाकत होती. जून 2002 रोजी एके दिवशी मी सकाळी उठलो आणि मित्राच्या दुकानात जाऊन फोन केला. मला निकाहनामा मिळाला असता त्यावर स्वाक्षरी केली. फोटोत दिसणाऱ्या मुलीशीच माझं लग्न होत आहे असं मला वाटत होतं," असं शोएबने मुलाखतीत सांगितलं होतं.
2005 मध्ये शोएबला आपण फोटो पाहिलेली मुलगी आणि लग्न केलं आहे ती मुलगी वेगळी असल्याचं समजलं. शोएबने जाब विचारला असता तिनेही कबुली दिली.
शोएबने त्याच्याकडे असणारे फोटो प्रसिद्ध करण्याचा विचारही केला होता. पण आयशाने तसे न करण्यास सांगितले कारण फोटोंमधील मुलगी आधीच विवाहित होती. फोटो प्रसिद्ध प्रकेल्याने तिचे आयुष्य उद्ध्वस्त होईल असं वाटल्याने मलिकने तसा न करण्याचा विचार केला.