मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज श्रेयस अय्यरने श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेत आपल्या बॅटने इतिहास रचला आहे. (Ind vs SL) भारत विरुद्ध श्रीलंका 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाने श्रीलंकेचा 3-0 असा क्लीन स्वीप केला. भारताच्या या ऐतिहासिक विजयाचा हिरो ठरला आहे श्रेयस अय्यर. संपूर्ण मालिकेत त्याने श्रीलंकेच्या बॉलर्सचा धुव्वा उडवला. तिन्ही सामन्यात श्रेयसने नाबाद अर्धशतकीय खेळी खेळली आणि अनेक विक्रम आपल्या नावावर केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रेयस अय्यरचे 200 च्या सरासरीने धावा


भारत विरुद्ध श्रीलंका ही T20 मालिका श्रेयस अय्यरच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉइंट ठरू शकते. ही मालिका सुरू होण्याआधी श्रेयसच्या टीम इंडियातील स्थानाबाबत शंका होती. पण आता त्याने असा पराक्रम केला आहे की संघ व्यवस्थापन त्याला संघातून बाहेर बसवण्याचा विचारही करू शकत नाही.


या संपूर्ण मालिकेत श्रेयस अय्यर एकदाही बाद झाला नाही. त्याने या मालिकेत एकूण 204 धावा केल्या आहेत, ज्यामुळे श्रेयस भारतासाठी तीन सामन्यांच्या T20I मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला.


विराट कोहलीचा विक्रम मोडला


श्रेयस अय्यरने टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. या फलंदाजाने 3 सामन्यांच्या T20I मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. श्रेयसच्या आधी विराटने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत सर्वाधिक 199 धावा केल्या होत्या. विराटने 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध हा विक्रम केला होता. मात्र आता याबाबत श्रेयस अय्यरने त्याला मागे टाकले आहे. श्रेयसने पहिल्या सामन्यात 52, दुसऱ्या सामन्यात 74 आणि शेवटच्या सामन्यात 73 धावा केल्या आहेत.


श्रेयस अय्यरने भारतासाठी एका मालिकेत विकेट न गमवता सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. श्रेयसच्या या विक्रमाच्या जवळपास एकही फलंदाज नाही. यापूर्वी हा विक्रम केएल राहुलच्या नावावर होता, ज्याने 2016 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध न आऊट न होता 110 धावा केल्या होत्या. यानंतर मनीष पांडेने 89, रोहित शर्माने 88 आणि दिनेश कार्तिकने 85 धावा केल्या.


भारत विरुद्ध श्रीलंका टी-20 मालिकेबद्दल बोलायचे झाले तर, सध्या रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला उत्तम कामगिरी करत आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सलग 4 मालिकेत विरोधी संघाचा क्लीन स्वीप केला आहे. 


श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या टी-20 सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासून शांकाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत श्रीलंकेला 146 धावांत रोखले. प्रत्युत्तरात भारताने 6 विकेट्स आणि 19 चेंडू राखून सामना जिंकला.