मोहाली : पंजाब विरुद्ध कोलकाता यांच्यात ३ मे रोजी मॅच खेळण्यात आली. या मॅचमध्ये कोलकाताने पंजाबचा ७ विकेटने पराभव केला. कोलकाताच्या या विजयामुळे प्ले-ऑफच्या आशादेखील कायम आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुभमन गिलने या मॅचमध्ये ४९ बॉलमध्ये नाबाद ६५ रनची तडाखेदार खेळी केली. यात त्याने ५ चौकार आणि २ सिक्स लगावले. या खेळीसह शुभमन गिलने आयपीएलमधील एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. 


शुभमन गिलने या कोलकाता विरुद्ध ५० रन पूर्ण करताच रेकॉर्ड आपल्या नावे केला. आयपीएलमधील ही त्याची चौथी अर्धशतकी खेळी ठरली आहे. विशेष म्हणजे वयाची २० वर्षपूर्ण होण्याआधी अशी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू ठरला आहे. शुभमन गिलचे सध्याचे वय १९ वर्ष इतके आहे.


पृथ्वी शॉ, संजू सॅमसन आणि इशान किशन यांनी वयाची २० वर्ष ओलांडण्याआधी प्रत्येकी ३ वेळा अर्धशतकी खेळी केली आहे. परंतु गिलने वयाच्या १९ व्या वर्षीच त्याने ४ अर्धशतक करण्याची कामगिरी केली आहे.


शुभमन गिलची आयपीएल कारकिर्द


शुभमन गिलने २०१८ ला हैदराबाद विरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. गिलने आयपीएलच्या यंदाच्या पर्वात एकूण १३ मॅच खेळल्या आहेत. यात त्याने २८७ रन केल्या आहेत. ७६ रन ही त्याची यंदाच्या पर्वातील आतापर्यंतची सर्वोत्तम खेळी आहे. ही सर्वोत्तम खेळी त्याने २८ एप्रिलला मुंबई विरुद्ध झालेल्या सामन्यात केली होती. या पर्वात गिलने आतापर्यंत ३ वेळा अर्धशतकी खेळी केली आहे.


पंजाबने प्रथम बॅटिंग करत निर्धारित २० ओव्हरमध्ये ६ विकेट गमावून १८३ रन केल्या. पंजाबकडून सॅम करनने सर्वाधिक नाबाद ५५ रन केल्या.  कोलकाताकडून संदीप वॉरियरने २ तर, नीतीश राणा, आंद्रे रसेल आणि हॅरी गर्ने या तिघांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. 


पंजाबने कोलकाताला विजयासाठी १८४ रनचे आव्हान दिले. कोलकाताने हे आव्हान अवघ्या ३ विकेट गमावून तसेच २ ओव्हरआधी पूर्ण केले. कोलकाताकडून शुभमन गिलने सर्वाधिक नाबाद ६५ रन केल्या. तर ख्रिस लिनने ४६ रन केल्या.