Shubman Gill Father Suggestionआपल्या मागील सहा एकदिवसीय सामन्यांमध्ये तीन शतक झळकावणारा भारताचा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) हा भारतीय संघासाठी नवीन रन मशीन असल्याप्रमाणे धावा कुटतोय. न्यूझीलंडविरोधातील पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये द्विशतक (Gill Double Century vs Nz) झळकावल्यानंतर गिलने तिसऱ्या आणि अंतिम सामन्यामध्येही शतक झळकावलं. शुभमनच्या खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्धची मालिका (One Day World Cup 2023) 3-0 ने जिंकत व्हाइटवॉश दिला. गिलच्या या दमदार फॉर्मचा त्याला या वर्षाच्या शेवटी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी संघातील आपलं स्थान पक्कं करण्यासाठी फायदा होणार आहे. 


द्रिवडने सांगितला शुभमनच्या वडिलांचा तो सल्ला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंदूरमधील तिसऱ्या सामन्यानंतर भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) गिलबरोबर दिलखुलास गप्पा मारल्या. या वेळी द्रविडने गिलचे वडील लखविंदर गिल यांनी आपल्या मुलाला दिलेल्या सल्ल्याबद्दल सांगितलं. चांगली सुरुवात करुन शतकापर्यंत न पोहचू शकणाऱ्या शुभमनला त्याच्या वडिलांनी काय सांगितलं होतं याबद्दल राहुलने माहिती दिली. "आधी शुभमन फार अर्धशतकं आणि 60 धावांपर्यंत मजल मारायचा आणि चांगली फलंदाजी करत होता. मात्र त्याला उत्तम सुरुवात केल्यानंतरही शतकापर्यंत पोहचता येत नव्हतं. त्यावेळी त्याच्या वडिलांना त्याला, "शुभमन तू आम्हाला फक्त केवळ थेंब थेंब पावसाने तृप्त करणार आहेत की मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाटही दाखवणार आहेस?" असा प्रश्न विचारला होता. मला वाटतं की मागील एका महिन्यामध्ये त्याने जी कामगिरी केली आहे ती पाहून त्याचे वडील फार समाधानी असतील. त्याने जी कामगिरी केली आहे त्यामधून बराच मुसळधार पाऊस पडलाय," असं राहुल म्हणाला. 


शुभमन म्हणतो वडील समाधानी नसतील


बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये द्रविड आणि गिल गप्पा मारत असल्याचं दिसत आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यामध्ये 78 चेंडूंमध्ये 112 धावा करणाऱ्या गिलने मी बाद झाल्यानंतर माझ्या वडिलांना आनंद नक्कीच होत नसेल असं म्हटलं. शुभनने द्रविडला, "मला नाही वाटत की ते या सामन्यातील कामगिरीमुळे फार समाधानी अशतील. ते नक्कीच मला म्हणतील की तुला या सामन्यामध्ये अधिक खेळायला हवं होतं. या सामन्यात अधिक मोठी धावसंख्या साकारायला हवी होती," असं म्हटलं.



द्रविड म्हणाला, "तुझे वडील मास्टर"


द्रविडने यावर, "कठीम कामामध्ये तुझे वडील मास्टर आहेत. आम्ही तुला धक्का दिला नाही तर ते हे काम करतील. तुझं भविष्य सुरक्षित हातात आहे," असं उत्तर दिलं.