सिडनी : ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्ह स्मिथनं पुन्हा एकदा विराट कोहलीवर निशाणा साधला आहे. विराटनं स्मिथवर डीआरएस चुकीच्या पद्धतीनं वापरण्याचा आरोप केला होता. विराटचा हा आरोप मूर्खपणाचा असल्याचं स्मिथ म्हणाला आहे. विराट कोहलीनं डीआरएसचा मुद्दा गुंतागुंतीचा बनवला होता, अशी प्रतिक्रिया स्मिथनं दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वर्षाच्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर आलेली ऑस्ट्रेलिया पहिली टेस्ट जिंकून आघाडीवर होती. त्यानंतर बैंगळुरूमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टच्या चौथ्या इनिंगमध्ये सोप्या आव्हानाचा ऑस्ट्रेलिया पाठलाग करत होती. याचवेळी स्मिथला एलबीडब्ल्यू आऊट देण्यात आलं. पण डीआरएस घेण्याबाबत स्मिथनं ड्रेसिंग रूममध्ये इशारा करून मदत मागितली. याबाबत कोहलीनं मैदानातच आक्षेप घेतला होता. तसंच अंपायर नायजल लाँगनंही स्मिथला असं करण्यापासून रोखलं होतं.


डीआरएस वापरण्यासाठी स्मिथनं ड्रेसिंग रूमची घेतलेल्या मदतीमुळे खेळ भावनेला नुकसान झाल्याचं कोहली म्हणाला होता. स्मिथनं त्याचं आत्मचरित्र 'द जर्नी'मध्ये कोहलीसोबतच्या या घटनेबाबत भाष्य केलं आहे. याआधीही ऑस्ट्रेलियाच्या टीमनं डीआरएससाठी ड्रेसिंग रूमची मदत मागितल्याचं कोहली म्हणाला होता, पण कोहलीच्या या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही, असं स्पष्टीकरण स्मिथनं या पुस्तकात केलं आहे.


'विराटला भांडायला आवडतं'


विराट कोहलीला मैदानामध्ये भांडायला आवडतं, असा आरोप स्मिथनं केला आहे. मैदानात आक्रमक राहिल्यामुळे तो सर्वश्रेष्ठ कामगिरी करतो. मलाही सीरिज सुरु असताना असंच वातावरण आवडतं, असं स्मिथ म्हणालाय.


डीआरएसच्या बाबतीत झालेल्या त्या वादावर आयसीसी, अंपायर किंवा मॅच रेफ्रीनं मला नंतर काहीच सांगितलं नाही. या प्रकरणानंतर मी आणि विराट कोहली अनेकवेळा भटलो. आयपीएलच्या कर्णधारांच्या बैठकीवेळीही विराट माझ्याबरोबर होता, तेव्हा त्याचं वर्तन मैत्रीपूर्ण होतं. त्या कडून आठवणी विराट विसरल्यासारखं वाटत होतं. ही गोष्ट नेहमीच माझ्यासाठी रहस्य राहिलं असा खुलासा स्मिथनं केलाय.