निलंबनानंतरही स्मिथ-वॉर्नरसाठी खुशखबर
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर कारवाई करण्यात आली आहे. या दोघांचं वर्षभरासाठी निलंबन करण्यात आलं आहे, अशी माहिती इंग्लंडमधल्या वृत्तपत्रांनी दिली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं या दोघांवर ही कारवाई केली आहे. तर ऑस्ट्रेलियाचा प्रशिक्षक डॅरेन लेहमनची हकालपट्टी करण्यात आली आहे.
निलंबनानंतरही खुशखबर
स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरचं एका वर्षासाठी निलंबन झालं असलं तरी त्यांना थोडाफार दिलासा मिळालेला आहे. २०१९ सालचा वर्ल्ड कप हे दोघंही खेळू शकतात. २०१९ सालचा वर्ल्ड कप ३० मेपासून सुरू होत आहे. त्यामुळे वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये या दोघांचाही विचार होऊ शकतो.
स्मिथची कबुली
ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्हन स्मिथनं चेंडू कुरतडल्याची बाब मान्य केली आणि क्रिकेटच्या दुनियेला मोठा धक्का बसला. तिस-या कसोटीच्या तिस-या दिवशी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू कॅमरुन बेनक्रॉफ्ट चेंडूशी छेडछाड करत असल्याचं समोर आलं. तिसऱ्या दिवशी लंच सुरु असताना बॉलची छेडछाड करण्याचं वरिष्ठ खेळाडूंनी ठरवल्याचं स्मिथनं मान्य केलं. लंचमध्ये झालेल्या बैठकीत स्मिथ आणि वॉर्नर असल्यामुळे या दोघांवर कारवाई करण्यात आली.
अशी झाली बॉलशी छेडछाड
दक्षिण आफ्रिकेच्या दुस-या डावातील ४३ व्या षटकात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर असलेला क्रिकेटपटू बेनक्रॉफ्ट बॉलशी छेडछाड करताना दिसला. बॉलला स्विंग मिळावा यासाठी त्याच्याकडून बॉलला टेप लावण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. त्यामुळे बॉल खेळपट्टीवर आदळून स्विंग मिळेल असं सांगण्यात येतं.
बेन्क्रॉफ्टचा रडीचा डाव पंचाच्या लक्षात आला तेव्हा त्यांनी याबाबत विचारणा केली. सुरुवातीला बेन्क्रॉफ्टनं या सगळ्या गोष्टी नाकारल्या. मात्र मैदानातील बड्या स्क्रीनवर बेन्क्रॉफ्टचा रडीचा डाव दाखवला गेला आणि तो गोंधळला. तिस-या दिवसाच्या खेळानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथनं बेन्क्रॉफ्टच्या बॉलशी छेडछाडीची जबाबदारी स्वीकारली.