नवी दिल्ली : नुकताच भारतीय संघाने ४ कसोटी सामन्याच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा २-१ असा पराभव करुन मालिका खिशात घातली. सिडनीतील शेवटची कसोटी पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णित राहिली. या कसोटी मालिकेत केलेल्या कामगिरीमुळे पुजारा मालिकावीर ठरला. कसोटी मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामने होणार आहेत. यानंतर ऑस्ट्रेलिया संघ ५ एकदिवसीय आणि २ टी-२० सामन्यांसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. या ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यासाठी पुजाराचा संघात समावेश नाही. तसेच यानंतर २९ मार्च ते १९ मे पर्यंत आयपीएलचे सामने सुरु असणार आहेत. यानंतर सर्व क्रिकेट चाहत्यांना वेध असतील ते विश्वचषकाचे. त्यामुळे अशा वेळेस पुजारा आणि त्यासारख्या टेस्ट स्पेशालिस्ट खेळाडू काय करणार असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांसमोर उभा ठाकला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या चिकाटी आणि संयमी खेळीमुळे पुजाराचे कसोटीतील स्थान पक्के आहे. पण या शैलीमुळे पुजाराला एकदिवसीय आणि टी-२० यासारख्या झटपट क्रिकेट प्रकारात समाविष्ट करणे शक्य नाही. अशावेळी त्याच्याकडे दोन पर्याय आहेत. एकतर रणजी किंवा स्थानिक क्रिकेट खेळून आपली कामगिरी अजून सुधारावी किंवा आराम करावा. असा प्रकार पुजारासोबत होण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधी २०१५ ला ऑस्ट्रेलियात झालेल्या विश्वचषकाच्या ८ महिने आधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून त्याला दूर रहावे लागले होते. त्याने डिसेंबर २०१४  मध्ये कसोटी खेळल्यानंतर ऑगस्ट २०१५ ला कसोटीत पुनरागमन केले. विशेष म्हणजे पुनरागमन केल्यानंतर पहिल्याच कसोटी सामन्यात त्याने शतकी कामगिरी केली. त्याने श्रीलंकेविरुद्ध नाबाद १४५ धावांची खेळी केली होती. यावरुन पुजारा कसोटी सामन्यांसाठी किती परिपूर्ण आहे, याची प्रचिती येते.


५ एकदिवसीय आणि २ टी-२० सामने संपल्यानंतर, आयपीएल सामने यानंतर विश्वचषक यामुळे पुजाराकडे ६-७ महिन्यांचा अवधी आहे. तसेच जुलै महिन्यापर्यंत भारतीय संघाचा कोणताही कसोटी दौरा नियोजित नाही. आयपीएलसाठी त्याला कोणत्याही संघाने खरेदी केले नाही. तसेच भारतीय संघाच्या एकदिवसीय आणि टी-२० संघासाठी त्याची निवड नसल्याने तो रिकामा असणार आहे.


ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन मायदेशी परतल्यानंतर, स्थानिक आणि रणजी सामने खेळण्याची इच्छा पुजाराने व्यक्त केली आहे. जेव्हा संपूर्ण देश आयपीएल सामन्यात रंगला असेल, तेव्हा पुजारा स्थानिक सामने खेळणार आहे. तसेच भारताच्या पुढील कसोटी दौऱ्यासाठी वेळ असल्याने मी संपूर्ण वेळ खेळात आणखी बदल करण्यासाठी देणार आहे. पुजाराचे लक्ष केवळ कसोटी सामन्याकडे असेल, असे दिसते.