मैदानानंतर सोशल मीडियावरही पृथ्वी शॉचा धडाका
कॅरेबियन गोलंदाज त्याला गोलंदाजी करत होते आणि तो चेंडू सीमापार धाडत होता
मुंबई : मुंबईकर पृथ्वी शॉनं पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावण्याची किमया साधली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या राजकोट कसोटीत त्यानं १३४ धावांची झंझावाती खेळी केली. शिखर धवन आणि ड्वेन स्मिथनंतर पदार्पणात सर्वात जलद कसोटी शतक ठोकणारा तो तिसरा क्रिकेटपटू ठरलाय.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वप्नवत पदार्पण काय असंत ते पृथ्वी शॉच्या चेहऱ्यावरुन स्पष्ट दिसतं. राजकोट कसोटीत मुंबईच्या या वंडरबॉयनं आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकावून अवघ्या क्रिकेट जगताचं लक्ष वेधून घेतलं. पहिला कसोटी सामना पृथ्वी खेळतोय असं त्याच्या फटकेबाजीतून कुठेही दिसलं नाही. कॅरेबियन गोलंदाज त्याला गोलंदाजी करत होते आणि तो चेंडू सीमापार धाडत होता....
पृथ्वी नावाचं कोडं कॅरेबियन गोलंदाजांना सोडवता आलंचं नाही..... आपल्या पहिल्या-वहिल्या कसोटी शतकाचा आनंद पृथ्वीला अजिबात लपवता आला नाही. त्यानं आपल्या भात्यातील सारेच फटके या खेळीत लगावले.....
पृथ्वी शॉनं १५४ चेंडूत १३४ धावांची तुफानी खेळी केली. त्याच्या या शतकी खेळीत १९ चौकारांचा समावेश होता. पृथ्वीनं ८७.०१ च्या सरासरीनं १३४ धावा केल्या...
कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणात शतक झळकावणार तो चौथा सर्वात तरुण क्रिकेटपटू आहे. याआधी बांग्लादेशच्या मोहम्मद अश्रफूलनं १७ वर्ष आणि ६१ दिवस, हॅमिल्टन मसाकाड्झा १७ वर्ष ३५२ दिवस, पाकिस्तानचा सलीम मलिक १८ वर्ष ३२३ दिवस आणि पृथ्वी शॉनं १८ वर्ष ३२९ दिवस पूर्ण करत कसोटी शतक झळकावलंय.
तर सचिन तेंडुलकरनंतर पृथ्वी कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा भारताचा दुसरा तरुण क्रिकेटपटू आहे. कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तो सातवा युवा क्रिकेटपटू ठरलाय. याआधी मोहम्मद अश्रफूल, मुश्ताक अहमद, सचिन तेंडुलकर, हॅमिल्टन मसाकाड्झा, इम्रान नाझिर आणि सलिम मलिक हे क्रिकेटपटू आहेत.
पृथ्वी शॉनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिमाखात पदार्पण केलंय. आता आगामी काळात आपल्या अविस्मरणीय खेळीनं टीम इंडियाला विजय साकारुन द्यावेत अशीच क्रिकेटप्रेमींची अपेक्षा असेल.