दुबई : टीम इंडियाचा उपकर्णधार रोहित शर्माने कबूल केलंय की, टी-20 वर्ल्डकपमध्ये आमचे काही निर्णय चुकीचे ठरले आहेत. पण बराच वेळ घराबाहेर राहिल्यामुळे मानसिक थकवा आल्याने असं घडतं, असा खुलासा हिटमॅन रोहित शर्माने केला आहे. बुधवारी अफगाणिस्तानविरुद्धच्या 66 धावांच्या विजयात 74 धावा करणारा रोहित पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवाचा संदर्भ देत होता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत तो म्हणाला, "या सामन्यातील दृष्टिकोन वेगळा होता. पहिल्या दोन सामन्यांमध्येही आम्ही असंच खेळावं अशी माझी इच्छा होती, पण तसं झालं नाही आणि जेव्हा आम्ही बराच काळ घरापासून दूर असतो तेव्हा असं घडतं. काही वेळा निर्णय चुकतात आणि पहिल्या दोन सामन्यांमध्येही असंच घडलं."


रोहित पुढे म्हणाला, "आजकाल खूप क्रिकेट खेळलं जातंय आणि आम्ही खूप क्रिकेट खेळत आहोत. अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा तुम्ही मैदानात उतरता तेव्हा योग्य निर्णय घ्यावा लागतो."


'तुम्ही मानसिकदृष्ट्या फ्रेश आहात याची काळजी घ्यावी लागेल. यामुळेच आपण काही चांगले निर्णय घेऊ शकलो नाही. भरपूर क्रिकेट खेळल्यानंतर अशा गोष्टी घडतात. कधी कधी खेळापासून अलिप्त होऊन मानसिरित्या उत्तम रहावं लागतं. पण जेव्हा तुम्ही वर्ल्डकप खेळत असाल तेव्हा त्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. काय करावं आणि काय नाही हे आपल्याला माहित असलं पाहिजे, असंही रोहित शर्मा म्हणालाय.


तो म्हणाला, 'आम्ही दोन सामन्यांत चांगलं खेळू शकलो नाही, पण याचा अर्थ असा नाही की आम्ही रातोरात वाईट खेळाडू बनलो. याचा अर्थ असा नाही की सर्व खेळाडू निरुपयोगी आहेत.