विराटच्या विधानावर पहिल्यांदाच सौरव गागुंली यांची प्रतिक्रिया; दिलं हे उत्तर
आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या मोठा गदारोळ माजला आहे. जेव्हापासून बीसीसीआयने विराट कोहलीला वनडेच्या कर्णधारपदापासून हटवलं आहे तेव्हापासून विविध वादांना तोंड फुटतंय. बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत विराटने वनडे आणि टी-20च्या कर्णधारपदावरून मोठी विधानं केली. यानंतर आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिली आहे.
सौरव गांगुलीने दिलं उत्तर
विराटने पत्रकार परिषदेत अनेक गोष्टींसदर्भात मोठे खुलासे केले आहेत. ज्यामध्ये त्याने बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली हे देखील चुकीच असल्याचं दाखवून दिलं आहे. तेव्हापासून या प्रकरणात गांगुली काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
आता विराटच्या त्या विधानावर गांगुलीने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. गांगुली यांना या प्रश्नाचे उत्तर विचारलं असता त्यांनी 'नो कमेंट्स' म्हटलंय. म्हणजेच या प्रकरणावर त्यांना कोणतंही उत्तर द्यायचं नाही. याशिवाय बीसीसीआय या प्रकरणाची चौकशी करेल असंही गांगुली यांनी सांगितलं.
दीड तासापूर्वी दिली विराटला कल्पना
एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्याबाबत बीसीसीआयने त्याला दीड तासांपूर्वीच कळवलं होतं, असं विधानही विराटने केलं होतं. पण बीसीसीआयने विराटला कर्णधारपदावरून हटवल्यावर मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी त्याला स्वतः फोन करून सर्व माहिती दिली होती, असं उत्तरही बीसीसीआयने दिले होते. पण आता विराट आणि बीसीसीआयमधील वाद वाढत चालला आहे.