Sourav Ganguly on Team India Head Coach : टीम इंडियाचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा कार्यकाळ आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup 2024) संपणार असल्याने आता बीसीसीआयने (BCCI) नवे अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची मुदत आला संपली असल्याने आता हेड कोचपदी कोणाची नियुक्ती होणार? असा सवाल विचारला जात आहे. अशातच आता केकेआरचा मेटॉर आणि टीम इंडियाचा वर्ल्ड कप विजेता गौतम गंभीर (Gautam Gambhir) याचं नाव आघाडीवर आहे. बीसीसीआयने गौतम गंभीरला अर्ज भरण्याची विनंती केली होती, अशी माहिती मीडिया रिपोर्टमधून समोर आली होती. अशातच आता येत्या काही दिवसात हेड कोचपदी कोण असेल? यावर शिक्कामोर्तब होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौतम गंभीर येत्या काळात टीम इंडियाच्या हेड कोचपदी (Team India Head Coach) दिसणार का? असा सवाल उपस्थित होतोय. त्याला कारण गंभीरने घातलेल्या अटी.. गौतम गंभीरने बीसीसीआयसमोर काही अटी ठेवल्या होत्या, अशी माहिती देखील समोर आली होती. अशातच आता येत्या काळात नाव स्पष्ट होणार आहे. मात्र, या सर्व प्रकरणात आता सौरव गांगुलीचं ट्विट चर्चेत आलंय. सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) एक ट्विट करत मुख्य प्रशिक्षक कसा असावा? यावरून बीसीसीआयचे कान टोचले आहेत. 


काय म्हणाला Sourav Ganguly ?


एखाद्याच्या आयुष्यात प्रशिक्षकाचं महत्त्व, त्यांचं मार्गदर्शन आणि अथक प्रशिक्षण हे मैदानावर आणि मैदानाबाहेरील कोणत्याही व्यक्तीचं भविष्य घडवतात. त्यामुळे प्रशिक्षक आणि संस्था हुशारीने निवडा, असा सल्ला सौरव गांगुलीने बीसीसीआयला दिला आहे. सौरव गांगुलीच्या ट्विटमुळे आता चर्चेला उधाण आलं आहे. सौरव गांगुलीचं ट्विट गंभीरच्या निवडीच्या विरोधात आहे का? असा सवाल विचारला जातोय. अनेक नेटकऱ्यांनी ट्विटवर कमेंट करत गांगुलीवर टीका केलीये. गांगुलीचं ट्विट गंभीर विरोधी असल्याचं अनेकांनी म्हटलंय. गांगुलीने केकेआरच्या विजयानंतर साधं अभिनंदन देखील केलं नव्हतं, त्यामुळे अनेक चर्चा उफाळून आल्या होत्या.


दरम्यान, एकदिवसीय क्रिकेट, टी-ट्वेंटी आणि टेस्टसाठी अशा वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगळा प्रशिक्षक असणार नाही. तिन्ही  फॉरमॅटसाठी एकाच प्रशिक्षकाचा शोध असेल, जो 3.5 वर्षांसाठी भारतीय क्रिकेट संघाची जबाबदारी सांभाळेल, असं जय शहा यांनी स्पष्ट केलं आहे. अशातच आता कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार? यावर कुजबूज ऐकायला मिळतीये.