कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली २३ ऑक्टोबरला बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारेल. यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच २४ ऑक्टोबरला बांगलादेशविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा होणार आहे. पण टीम निवडीची प्रक्रिया २१ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. टीम इंडिया ३ नोव्हेंबरपासून बांगलादेशविरुद्ध टी-२० सीरिज खेळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलादेशविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये धोनीला स्थान मिळेल का? असा प्रश्न सौरव गांगुलीला विचारण्यात आला. याबाबत आपण निवड समितीशी बोलणार आहोत, असं गांगुलीने स्पष्ट केलं आहे. 'मी २४ ऑक्टोबरला निवड समितीची भेट घेणार आहे. निवड समिती धोनीबाबत काय विचार करत आहे? याची माहिती घेईन आणि मग माझं मत व्यक्त करेन,' असं गांगुली म्हणाला.


एखादा क्रिकेटपटू एवढी विश्रांती घेऊ शकतो का? असंही गांगुलीला विचारण्यात आलं. 'मी आतापर्यंत या प्रक्रियेत सामील नव्हतो. निवड समितीसोबत माझी बैठक २४ ऑक्टोबरला होणार आहे,' अशी प्रतिक्रिया गांगुलीने दिली.


वर्ल्ड कपच्या सेमी फायनलनंतर धोनी क्रिकेटपासून लांब आहे. धोनी वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटची मॅच खेळला होता. या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला होता. यानंतरच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातून धोनीने माघार घेतली होती. धोनी दोन आठवडे लष्कराची सेवा करायला गेला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठीही धोनीची निवड झाली नव्हती.