हा भारतीय व्हावा टीम इंडियाचा प्रशिक्षक, शोएब अख्तरचा सल्ला
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत.
मुंबई : टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत. त्यामुळे आता टीम इंडियाचा प्रशिक्षक कोण होणार? रवी शास्त्री यांना पुन्हा संधी दिली जाणार नाही का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यातच आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने याबाबत वक्तव्य केलं आहे. सौरव गांगुलीने टीम इंडियाचा प्रशिक्षक व्हावं, अशी मागणी शोएब अख्तरने केली आहे.
'भारतीय क्रिकेट आणखी चांगलं होण्यासाठी सौरव गांगुलीने बीसीसीआयचा अध्यक्ष झालं पाहिजे. पण जर तो अध्यक्ष होणार नसेल तर त्याने टीम इंडियाचं प्रशिक्षक व्हावं. गांगुलीपेक्षा चांगला, शहाणा आणि चतूर माणूस संपूर्ण भारतात नाही. सौरव गांगुली प्रशिक्षक झाला, तर यापेक्षा चांगली गोष्ट भारतीय क्रिकेटसाठी काहीच असू शकत नाही, असं शोएब अख्तर एका युट्यूब चॅनलशी बोलताना म्हणाला.
वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. यानंतर बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवायला सुरुवात केली. त्यामुळे रवी शास्त्री यांचं पद धोक्यात आल्याचं बोललं जात आहे. पण प्रशिक्षक होण्यास इच्छूक म्हणून रवी शास्त्री पुन्हा अर्ज करु शकतात. वर्ल्ड कपनंतर रवी शास्त्री यांचा करार संपणार होता, पण लगेचच वेस्ट इंडिज दौरा असल्यामुळे रवी शास्त्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा करार ४५ दिवसांनी वाढवण्यात आला.
यावेळी टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची निवड कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांथा रंगस्वामी यांची समिती करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीने त्रिसदस्यीय सल्लागार समितीची नेमणूक केली आहे. कपिल देव या समितीचे अध्यक्ष आहेत. कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांथा रंगस्वामी यांची क्रिकेट सल्लागार समिती प्रशिक्षकपदासाठी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. याआधी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने रवी शास्त्री यांची निवड केली होती.